लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ‘भौतिक संपत्तीपेक्षा बौद्धिक संपत्ती माणसाला समाधान देते. कुटुंब समाधानी करायचे असेल आणि विद्यार्थ्यांवर नैतिक मूल्यांचे संस्कार करायचे असतील, तर शिक्षणामध्ये अध्यात्माचा समावेश करणे महत्त्वाचे आहे,’ अशी अपेक्षा प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्तीमहाराज इंदोरीकर यांनी गुरुवारी व्यक्त केली.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते निवृत्तीमहाराज इंदोरीकर यांना गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी इंदोरीकर बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरीमहाराज देव, कार्याध्यक्ष डाॅ. गजानन एकबोटे, सचिव श्यामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे या वेळी व्यासपीठावर होत्या.
इंदोरीकर म्हणाले, ‘माणसाची उंची ही त्याच्या ज्ञानावर आणि कर्तृत्वावर अवलंबून असते. माणसाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे हेच संतांनी सांगितले आहे. शरीरावर केलेला अन्याय म्हणजे रोगाची उत्पत्ती असते. भरपूर संपत्ती कमावणे म्हणजे भावी पिढी आळशी करण्यासारखे असते. स्वतःची बौद्धिक संपत्ती सांभाळली म्हणून कानिटकर यांना इतरांच्या बुद्धीला चालना देता आली. कर्तृत्व, त्याग आणि समर्पणभाव यातून संस्थेची प्रगती होत असते. कुटुंब समाधानी करायचे असेल, तर अध्यात्माची कास धरावी लागेल. त्यासाठी शिक्षण संस्थांमध्ये आध्यात्मिक शिक्षण दिले पाहिजे. शिक्षणाचा अर्थ समजला असता, तर राज्यात वृद्धाश्रम निर्माण झाले नसते. अंगातील ताकद आणि खिशातील पैसा संपला, की माणूस संपतो. माझे आई-वडील माझ्याच घरात राहतील, हा संकल्प सर्वांनी करावा.’
मोहोळ म्हणाले, ‘समाज कुठल्या दिशेने चालला आहे आणि त्यावर मार्ग कसा काढायचा, याविषयी इंदोरीकर महाराज कीर्तनातून मार्गदर्शन करतात. पुण्यनगरीची सांस्कृतिक ओळख या पुरस्काराने कायम ठेवली आहे.’
डॉ. काळकर, डॉ. एकबोटे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी आभार मानले. संस्थेच्या उपकार्यवाह डॉ. निवेदिता एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले.