खेळाडूंच्या औषधांमध्ये अमली पदार्थाचा शिरकाव होईल आणि या बाबीचा तपास करावा लागेल असा विचारही काही वर्षांपूर्वी कोणी केला नसेल. पण, उत्तम खेळ होण्याच्या उद्देशातून शॉर्टकट वापरले जात आहेत. त्यातून खेळाचा मुख्य उद्देश साध्य होत नाही. खेळातून राष्ट्रभक्त नागरिकांची घडण होते. त्यामुळे खेळाडूंनी खेळाच्या स्थूल आणि सूक्ष्म अंगाचा विचार केला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी व्यक्त केले.
‘क्रीडा भारती’तर्फे २५ राज्यांतील युवकांसाठी आयोजित केलेल्या पर्वतारोहण मोहिमेचा भागवत यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ झाला. संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पारडीकर, महामंत्री राज चौधरी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक लेले, महानगर अध्यक्ष प्रा. शैलेश आपटे आणि संघाचे अखिल भारतीय शारीरिक प्रमुख अनिल ओक या वेळी उपस्थित होते. या मोहिमेमध्ये सहभागी झालेले गिर्यारोहक शिवनेरी, सिंहगड, प्रतापगड, राजगड आणि रायगड या किल्ल्यांना भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती घेणार आहेत.
मोहन भागवत म्हणाले, मनोरंजन आणि तंदुरुस्ती ही खेळाची स्थूल अंगे आहेत. पण, क्रीडा भारती ही खेळाच्या सूक्ष्म अंगाचा विचार करणारी संघटना आहे. खेळामध्ये जीवनाचे मूल्य सामावले असून क्रीडाप्रकार माणसाचे शरीर कणखर बनवितात. गिर्यारोहणामध्ये साहस आणि कला या दोन्ही बाबी अंतर्भूत आहेत. अनेकांनी मिळून करावयाचे गिर्यारोहण ही एका अर्थाने संघ कृती आहे. समाजाला आणि मानवतेला एकत्र घेऊन कसे जायचे याचा छोटा वस्तुपाठच गिर्यारोहणातून मिळतो. बुद्धी, शक्ती, पराक्रम, साहस, धैर्य आणि उद्यमशीलता ही खेळाची सूक्ष्म अंगे आहेत. त्यांचा विचार करण्यातूनच संघटन कौशल्य विकसित होते. देशी खेळाला प्राधान्य देत खेळातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविणे हाच क्रीडा भारतीचा प्रयत्न आहे. युवा पिढीला सर्वगुणसंपन्न करण्याच्या प्रयत्नांतूनच भारत अग्रेसर राष्ट्र होईल.
‘साहसी खेळ’ ही क्रीडा भारतीची यंदाची संकल्पना असल्याचे राज चौधरी यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा