करोनाच्या काळात ज्यांनी कंबर कसून सामान्यांना करोनाविरोधात लढण्यास मदत केली, त्या डॉक्टरांना आणि आरोग्य सेवकांना करोना योद्ध्यांची उपमान दिली गेली. देशाच्या पंतप्रधानांपासून ते अगदी शेवटच्या माणसापर्यंत सर्वांनी आरोग्य क्षेत्रातील मंडळींना करोनाविरोघातील लढ्यासाठी धन्यवाद दिले आहेत. मात्र, त्यातल्याच एका महिला डॉक्टरसाठी प्रचंड धक्कादायक बाब नुकतीच पुण्यात घडली आहे. एका नामंकित रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे संबंधित रुग्णालयात देखील खळबळ उडाली आहे.
नेमकं घडलं काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरातील एका रुग्णालयात मागील काही वर्षांपासून फिर्यादी महिला डॉक्टर म्हणून काम करते. या महिला डॉक्टर रुग्णालयाच्याच सर्व्हिस क्वॉर्टर्समध्येच राहतात. त्या मंगळवारी कामावरून घरी आल्यानंतर बेडरूम आणि बाथरूम मधील लाईट लागत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. रिपेअरिंगसाठी त्यांनी वायरमनला बोलवून घेतले. मात्र, वायरमनने तपास केल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली.
कॅमेऱ्यात सापडलं मेमरी कार्ड!
या महिला डॉक्टरच्या बाथरूम आणि बेडरूमच्या होल्डरमध्ये स्पाय कॅमेरा लावला असल्याचं निदर्शनास आलं. हा कॅमेरा बाहेर काढला असता त्यात मेमरी कार्ड असल्याचं देखील दिसून आलं. हा काय प्रकार आहे हे लक्षात आल्यानंतर लागलीच महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत परिस्थितीची पाहणी केली. यासंदर्भात पोलिसांनी क्वॉर्टर्सच्या सुरक्षारक्षकाकडे विचारणा केली असता क्वॉर्टर्समध्ये कुणीही आलं नसल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळे नेमका हा प्रकार घडला कसा? आणि संबंधित महिला डॉक्टरच्या बाथरूम आणि बेडरूममध्ये स्पाय कॅमेरा लावला कुणी? याविषयी पोलीस सखोल तपास करत आहेत.