पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेमध्ये लष्कर भागातील श्रीकृष्ण तरुण मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील श्री काळभैरवनाथ तरुण मंडळाने तृतीय, नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने चौथे, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.
श्री गणेश कला क्रीडा मंच येथे शनिवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे या वेळी उपस्थित होते.स्पर्धेत सहभागी झालेल्या १८५ मंडळांपैकी १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १२ लाख ६५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.