परीक्षा संपण्यापूर्वीच निकालाच्या तारखांच्या अफवा
व्हॉट्सअ‍ॅप आणि समाज माध्यमातून पसरणाऱ्या अफवांमुळे आता राज्यमंडळ जेरीस आले आहे. राज्यमंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपण्यापूर्वीच निकालाच्या तारखांबाबतचे संदेश फिरू लागले आहेत. मात्र निकालाच्या कोणत्याही तारखा राज्यमंडळाने जाहीर केलेल्या नाहीत, असे स्पष्टीकरण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी केले आहे.
व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पसरणाऱ्या अफवांना आवर कसा घालायचा असा प्रश्न राज्यमंडळाला पडला आहे. बारावीच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू झाल्यावर अवघ्या काही मिनिटांत व्हॉट्सअ‍ॅपवरून सगळीकडे पसरल्या होत्या. परीक्षांच्या कालावधीत व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका फुटल्याच्या काही अफवांनीही विद्यार्थ्यांचा गोंधळ उडवून दिला होता. एखाद्या विषयाची परीक्षा कठीण असेल तर प्रश्नपत्रिकाच चुकीची असल्याचे संदेश काही क्षणांत व्हॉट्सअपवरून पसरले होते. राज्यमंडळाचे अधिकृत वेळापत्रक न पाहताच खासगी शिकवणीने इंटरनेटवर मिळालेले वेळापत्रक विद्यार्थ्यांना वाटल्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेपासूनच वंचित राहावे लागले. अशा रोज नव्या घटना समोर येत असतानाच आता परीक्षा संपण्यापूर्वीच निकालाच्या तारखांचे संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर फिरू लागले आहेत. जुलैमधील परीक्षेमुळे यावर्षी निकाल लवकर जाहीर होण्याच्या चर्चेमुळे निकालाच्या तारखांबाबत आतापासूनच उत्सुकता आहे.
निकाल कधी जाहीर होणार, गुणपत्रक कधी मिळणार, कोणत्या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल, असे संदेश फिरत आहेत. मात्र या संदेशांमधील तारखा या गेल्यावर्षीच्या निकालाच्या आहेत. राज्यातील परीक्षाही अद्याप संपलेल्या नाहीत. बारावीची परीक्षा २८ मार्चला तर दहावीची परीक्षा २९ मार्चला संपणार आहे.
उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन झाल्यावर विभागस्तरावर निकालाचे एकत्रीकरण होते आणि नंतर राज्यमंडळाकडून निकाल तयार होतो. निकाल जाहीर करण्याची तारीख निश्चित झाली की दोन दिवस आधी ती राज्यमंडळाकडून जाहीर करण्यात येते. समाज माध्यमांवर फिरणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन राज्यमंडळाकडून करण्यात आले आहे.

‘राज्यमंडळाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची कोणतीही तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. अजून परीक्षाही संपलेल्या नाहीत. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पसरणाऱ्या अफवांवर पालक आणि विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये. या अफवांबाबत राज्यमंडळाकडून चौकशी करण्यात येईल.’
– गंगाधर मम्हाणे, अध्यक्ष, राज्यमंडळ

Story img Loader