राज्य मंडळाकडून मार्च २०१६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता १० नोव्हेंबपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे अर्ज राहिले आहेत, त्या शाळांतील कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सुट्टय़ांमधेही काम करावे लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया १९ ऑक्टोबरपासून सुरू झाली. अर्ज भरण्यासाठी शनिवापर्यंत (३१ ऑक्टोबर) मुदत होती. मात्र, अजूनही अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याचे राहिले असल्यामुळे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांना १० नोव्हेंबपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. विलंबशुल्कासह अर्ज भरण्यासाठी १९ नोव्हेंबपर्यंत मुदत आहे. या वर्षी परीक्षेच्या अर्जात आधार क्रमांक नोंदवण्यासाठीही रकाना देण्यात आला आहे. मात्र, आधार क्रमांक नोंदवणे बंधनकारक नसल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर दुष्काळी भागांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेण्यात येऊ नये अशी सूचनाही शाळांना देण्यात आली आहे. मंडळाच्या http://www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

Story img Loader