पुण्यातील मुकुंदनगर भागातील एक शाळा.. दहावीच्या परीक्षांमुळे शाळेत गर्दी.. शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यासांत गढलेले विद्यार्थी, मुलांइतकेच टेन्शनमध्ये असलेल्या पालकांच्या सूचना, वर्ग खोली शोधण्याची घाई.. असे नेहमीचेच वातावरण. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास घंटा झाली आणि एका वर्गात एक आजोबा वाटावेत असे गृहस्थ शिरले. विद्यार्थ्यांना आणि पर्यवेक्षकांनाही कुणी पालक असावेत, असेच वाटले. मात्र, ते आजोबा चक्क वर्गातल्या एका बाकावर जाऊन बसले. परीक्षा देण्यासाठी! महादेव उमाजी गजधने हे ६४ वर्षांचे गृहस्थ निवृत्तीनंतर दहावीची परीक्षा देत आहेत.
गजधने हे सोलापूर महानगर पालिकेत सेवक होते. महानगरपालिकेत २५ वर्षे नोकरी केली. निवृत्त झाल्यानंतर ते पुण्यात मुलाकडे स्थायिक झाले. लहानपणापासून शिकायची आवड होती. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे शिक्षण घेता आले नाही. निवृत्तीनंतर हातात वेळही होता आणि संधीही होती. म्हणून दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बाहेरून परीक्षा देता येते हे माहीत होते. महापालिकेत काम करत असताना अनेकांनी परीक्षा दिल्याचे पाहिलेही होते. मग अर्ज कसा भरायचा, परीक्षा कशी द्यायची या सगळ्याची माहिती गोळा केली. दहावीच्या परीक्षेसाठी पुस्तकेही गोळा केली. गुलटेकडी येथील विश्वकर्मा विद्यालयातून परीक्षेचा अर्ज भरला. ‘‘मला शिकायचे होते. मात्र, शिकता आले नाही. त्यामुळे आता निवृत्तीनंतरही परीक्षा द्यायचे ठरवले. ही परीक्षा उत्तीर्ण झालो तर पुढील परीक्षाही द्यायची इच्छा आहे. शाळेत परीक्षेच्या वर्गात मुलांना आश्चर्य वाटते. माझ्या नातवंडासारखी असलेली मुले मला सांभाळूनही घेतात,’’ असे गजधने यांनी सांगितले.
गजधने यांच्या उत्साहात त्यांचे कुटुंबीयही सहभागी झाले आहेत. एखाद्या नियमित परीक्षा देणाऱ्या मुलाच्या घरांत जसे वातावरण असेल, तसेच वातावरण त्यांच्या घरात आहे. घरच्यांकडूनही परीक्षा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळत आहे. प्राथमिक शाळेत जाणाऱ्या नातीबरोबर महादेव गजधनेही उत्साहाने अभ्यास करत आहेत. आपल्या वडिलांचा उत्साह आणि जिद्द यांबाबत महादेव गजधने यांचा मुलगा विनोद याला खूप अभिमान वाटतो. वडिलांच्या परीक्षा देण्याच्या निर्णयामुळे आनंद झाल्याचे विनोद याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा