दहावीचा निकाल या वर्षी उशिरा जाहीर झाला असूनही अकरावीचे वर्ग मात्र गेल्या वर्षीपेक्षा लवकर सुरू होणार आहेत. अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार आहेत. प्रवेश अर्जाचा दुसरा टप्पा विद्यार्थ्यांना २३ जूनपर्यंत भरता येणार आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्ष आणि विभागीय उपसंचालक सुमन शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वर्षी अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार आहेत. गेल्या वर्षी अकरावीचे महाविद्यालय १ ऑगस्टपासून सुरू झाले होते. या वर्षी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाइन पद्धतीमुळे प्रवेशप्रक्रियेचा कालावधी कमी होणार आहे. अकरावीच्या प्रवेश अर्जाचा दुसरा टप्पा विद्यार्थ्यांना २३ जून सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. दहावीला मिळालेले गुण, महाविद्यालयाचे अंतर या सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम द्यावेत, असे आवाहन अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने केले आहे.
पहिली गुणवत्ता यादी २८ जूनला जाहीर करण्यात येणार असून ३० जून ते २ जुलै या कालावधीत प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानंतर ५ जुलैला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. ७ ते ८ जुलै या कालावधीत दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश प्रक्रिया होणार आहे. ११ जुलैला तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे आणि १२ ते १४ या कालावधीत तिसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश प्रक्रिया होणार आहे. १५ जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू होणार असून १५ व १६ जुलैला एटीकेटीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया होणार आहे.
हे लक्षात घ्या
– महाविद्यालयांचे पहिले ३० प्राधान्यक्रम काळजीपूर्वक भरा
– प्राधान्यक्रम भरताना महाविद्यालयाचे गेल्या वर्षीचे कट ऑफ, मिळालेले गुण, शाखा, विनाअनुदानित आणि अनुदानित तुकडी, महाविद्यालयाचे घरापासूनचे अंतर, महाविद्यालयात शिकवले जाणारे विषय अशा सर्व मुद्दय़ांचा विचार करा.
– महाविद्यालयाचे कोड अचूक भरा
– अर्ज भरल्यावर आठवणीने सबमिट आणि कन्फर्म बटणावर क्लिक करा. त्याशिवाय अर्ज गृहीत धरला जाणार नाही
आवश्यक असल्यास तुकडय़ा वाढवणार – शिंदे
या वर्षी दहावीचा निकाल जास्त लागल्याने गरज लागल्यास अकरावीच्या तुकडय़ा वाढवण्यात येतील, असे शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी सांगितले. शिंदे म्हणाल्या, ‘२३ जूनला विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यानंतर कोणत्या शाखेला उपलब्ध जागांपेक्षा अर्ज आले आहेत, त्याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर गरज असल्यास आणि महाविद्यालयांनी अर्ज केल्यास तुकडय़ा वाढवण्याचा विचार केला जाईल.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा