दहावीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रांमधील चुकांचा गोंधळ अजूनही कायम असतानाच विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचा नवा गोंधळ बोर्डाने घातला आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था दोन वेगवेगळ्या केंद्रांवर दिसत असल्यामुळे परीक्षा नेमकी कोणत्या केंद्रावर द्यायची, हा प्रश्न निर्माण झाल्याने विद्यार्थी आणि पालक गोंधळात पडले आहेत. मंडळाच्या ‘हेल्पलाइन्स’ही बंद असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
परीक्षेच्या दिवशी बैठक व्यवस्था पाहण्यात वेळ जाऊ नये, यासाठी परीक्षेच्या आदल्याच दिवशी बैठक व्यवस्था पाहण्याकडे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कल असतो. दहावीच्या परीक्षेची बैठक व्यवस्था पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर रविवारी गर्दी केली होती. मात्र, बहुतेक केंद्रांवरील बैठक व्यवस्थेमध्ये असलेले गोंधळ पाहून परीक्षेच्या आदल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नव्या ताणाला सामोरे जावे लागले. एका विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था काही विषयांसाठी दोन केंद्रांवर करण्यात आली आहे. काही केंद्रांवर जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाच्या बैठक व्यवस्थेबाबत स्पष्टीकरण नाही.
अप्पा बळवंत चौकातील मुलांची नू.म.वि आणि अहिल्यादेवी प्रशालेमध्ये परीक्षेचे केंद्र आहे. या केंद्रावर ११ तारखेला होणारी बीजगणिताची परीक्षा, १३ तारखेला होणारी भूमितीची परीक्षा आणि १८ तारखेला होणारी विज्ञान-तंत्रज्ञान या विषयांच्या परीक्षेसाठी जवळपास पाचशे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था नूमवि आणि अहिल्यादेवी या दोन्ही केंद्रांवर दिसत आहेत. या तिन्ही परीक्षांसाठी अहिल्यादेवी प्रशालेमध्ये सीओ ३८९६५ ते सीओ ३९७५९ या क्रमांकांची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसत आहे. या परीक्षा क्रमांकामधील सीओ ३९११२ ते सीओ ३९५७० या क्रमांकांची बैठक व्यवस्था नूमविमध्येही करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या बैठक व्यवस्थेमधील तक्रारी इतरही अनेक केंद्रांवर दिसत आहेत.
हेल्पलाइन नावालाच, विद्यार्थ्यांना उत्तरे देण्यासाठी कुणीही नाही
विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी काही अडचणी असल्यास विभागीय मंडळांकडून हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ही हेल्पलाइन सुविधा नावालाच असल्याचे उघड झाले आहे. बैठक व्यवस्थेबाबत असलेल्या शंका विचारण्यासाठी हेल्पलाइनवर फोन संपर्क साधायचा प्रयत्न केला असता, हेल्पलाइन्स बंद असल्याचे पालकांनी सांगितले. परीक्षेसाठी शाळा व विभागीय मंडळे रविवारीही काम करणार असल्याचे राज्यमंडळाने सांगितले असले, तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी रविवारी परीक्षा केंद्रांवर कुणीच नव्हते.
तारखेतही चुका
परीक्षा केंद्रांवर लावण्यात आलेल्या वेळापत्रकामध्ये तारखेची चूकही मंडळाने केली आहे. सामान्य गणित विषयाची भाग १ आणि भाग २ या विषयांच्या परीक्षांची तारीख अनुक्रमे ११ आणि १३ मार्च २०१५ दाखवण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा