पुणे-मुंबई दरम्यानच्या एसटी प्रवासात बस दोन वेळा बंद पडल्याने आणि त्यानंतर प्रवाशाला खासगी बसने पुढचा प्रवास पूर्ण करावा लागल्याने ग्राहक न्यायमंचाने स्वारगेट एसटी स्थानकाच्या आगर व्यवस्थापकाला दणका दिला. प्रवाशाला आगार व्यवस्थापकाने योग्य सेवा दिली नाही, त्याचबरोबर त्यांना लहान मुलांसह रस्त्यावर उन्हात उभे राहावे लागले. या गोष्टींची दखल घेत न्यायमंचाने, प्रवाशाला तिकिटाचे सहाशे रुपये, मानसिक व शारीरिक त्रासापोटी तीन हजार रुपये आणि खटल्याचा खर्च एक हजार असे एकूण ४६०० रुपये देण्याचा आदेश दिला.
या घटनेबाबत शरद गोपीनाथ बोत्रे (रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, लक्ष्मीनगर, पुणे) यांनी एसटी महामंडळाच्या स्वारगेट आगार प्रमुखाच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती. बोत्रे यांना पत्नी, मुलगी आणि नातवंडांसह बोरीवलीला जायचे होते. त्यांनी पुणे ते बोरीवली या एसटी बसचे सकाळी दहाचे तिकीट आरक्षित केले होते. या बसने जात असताना पनवेलजवळ बसचा टायर पंक्चर झाल्यामुळे बोत्रे यांच्यासह सर्व प्रवाशांना सामानासह रस्त्यावर थांबावे लागले. बसच्या वाहकाने प्रयत्न करून बोत्रे व त्याच्या कुटुंबियांना महाड-बोरीवली या बसमध्ये बसविले. काही वेळ प्रवास केल्यानंतर त्याही बसचा ब्रेक फेल झाले. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर कोणतीही बस थांबण्यास तयार होईना. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून खासगी टॅक्सीने बोरीवलीपर्यंत जावे लागले. विनाकारण मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला आणि आर्थिक दंड ही सोसावा लागल्यामुळे बोत्रे यांनी स्वारगेट आगार व्यवस्थेच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती.
आगार व्यवस्थापकांना मंचने नोटीस बजावल्यानंतर त्यांनी मंचासमोर हजर होऊन लेखी म्हणणे सादर केले. त्यांनी तक्रारांची तक्रार अमान्य केली. बस स्थानकाहून बस निघण्यापूर्वी तिची कार्यशाळेतून तपासणी करून मार्गस्थ केली. बसचा टायर पंक्चर झाल्यामुळे गाडी बंद झाली आणि वाहकाने दुसऱ्या बसमध्ये त्यांना बसवून लावले. दुसरी बसही बंद पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी उभ्या असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसविले. तक्रारदारांना तातडीने प्रवास करायचे काय कारण होते हे समजत नाही. त्यांनी प्रवास केल्यामुळे त्यांचे तिकिटाचे भाडे परत देता येऊ शकत नाही, असे मत मंचाने मांडले. त्या मंचाने निकाल देताना बसचे टायर पंक्चर होणे ही घटना अनपेक्षित आहे. वाहकाने त्यांना दुसऱ्या बसमध्ये बसून पाठविले, मात्र ती बस सुद्धा बंद पडली. त्यामुळे तक्रारदार यांना सामान, लहान मुले यांच्यासह रस्त्यावर वाट बघत उभे राहणे ही बाब प्रवाशांना त्रासदायक झालेली आहे. प्रवाशांना त्यामुळे स्वत:चे पैसे खर्च करून पुढील प्रवास करावा लागला. अगोदर पैसे घेऊन प्रवास पूर्ण करून देण्यात अपयशी ठरले आहेत. तक्रारदारांनी पनवेलपर्यंत प्रवास केल्यामुळे त्या ठिकाणापासूनची तिकिटाची रक्कम आणि नुकसान भरपाई देण्याचा आदेश मंचाने दिला आहे.