पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसचालकाने मद्याधुंद अवस्थेत बस चालवून अपघात केल्याप्रकरणी संबंधित बसचालकाला सेवेतून काढून टाकल्याची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या पुढे अशा घटना घडू नये, म्हणून बसचालकांना सूचना देण्यात आल्याची माहिती ‘एसटी’ महामंडळाच्या पुणे विभागाकडून देण्यात आली.पुणे ‘एसटी’ महामंडळाकडून दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट बसस्थानकातून रात्री धाराशीवला जाणारी बस स्वारगेटवरून ४४ प्रवासी घेऊन निघाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे-सोलापूर महामार्गावरून रात्री उशिरा १२.३० ते एकच्या सुमारास लोणी काळभोर येथील कदमवाक वस्ती येथे समोरील खासगी प्रवासी बसला मागून धडक दिल्याने अपघात घडला. सुदैवाने अपघातात कोणाला इजा झाली नसली, तरी बसच्या पुढील बाजूचे नुकसान झाले. अपघाताबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मद्यासेवन चाचणीत बसचालकाने मद्यासेवन केल्याचे तपासात समोर आले. त्या पार्श्वभूमीवर बसचालकाला सेवेतून काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली असून, पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात बसचालकाने कामकाजाच्या वेळेत मद्यासेवन केल्याचे आढळले. त्यामुळे बसचालकाला सेवेतून काढून टाकण्याची कारवाई केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विभागातील बसचालकांची वेळोवेळी मद्याचाचणी करण्यात येत आहे. बसचालकांनादेखील सुरक्षित प्रवासाच्या अनुषंगाने वेगमर्यादेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, ‘एसटी’ महामंडळ, पुणे.