डिझेलच उपलब्ध नसल्याने स्वारगेट एसटी स्थानकातून सुटणाऱ्या विविध गाड्या रद्द कराव्या लागल्याने बुधवारी चांगलाच गोंधळ उडाला. प्रवाशांना या प्रकारामुळे मन:स्ताप सहन करावा लागला. एसटी गाड्यांसाठी डिझेल उपलब्ध करून देणाऱ्या पंपचालकाची थकबाकी न भरल्याच्या कारणावरून ही स्थिती निर्माण झाली होती.
एसटीच्या गाड्यांसाठी खासगी पेट्रोल पंपचालकांच्या माध्यमातून डिझेल उपलब्ध करून दिले जाते. मासिक पद्धतीने डिझेलची रक्कम एसटी महामंडळाकडून जमा केली जाते. बुधवारी नेहमीप्रमाणे विविध मार्गांवर निघण्यापूर्वी एसटी चालकांनी स्थानकाच्या जवळ असलेल्या आणि एसटीचा करार असलेल्या पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गाड्या नेल्या असता डिझेल उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
हेही वाचा >>> पुणे : आता शाळेतही ‘अखंड भारत’ त्रिमितीय नकाशाचे अनावरण ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन
गाड्यांच्या वेळेमध्ये प्रवासी स्थानकावर दाखल झाले होते. मात्र, डिझेलच नसल्याने चालकांनी गाड्या पुन्हा आगारात लावल्या. प्रवासासाठी वेळेत गाड्याच उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागला. प्रवाशांनी याबाबत स्थानकात विचारणा केली, मात्र त्यांना योग्य उत्तर मिळाले नाही. पेट्रोल पंप चालकाची डिझेलची थकबाकी न भरल्यामुळे डिझेलसाठी नकार देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे दिवसभर स्थानकातील गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते.