पुणे : ‘एसटी’च्या नोव्हेंबर महिन्यातील विक्रमी उत्पन्नात राज्यात पुणे अव्वल असून, ५६ कोटी रुपयांचे उत्पन्न एकट्या पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला प्राप्त झाले आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, दिवाळसणाच्या सुट्ट्या, प्रवासशुल्कात महिलांना ५० टक्के सवलत, ७५ वर्षांपुढील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि भाडेवाढीत देण्यात आलेली सूट यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) नोव्हेंबर महिन्यात चांगले उत्पन्न मिळाले आहे. राज्यातील ३१ जिल्ह्यांतून ‘एसटी’ने केवळ नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक ९४१ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे राज्यात सर्वाधिक ५६ कोटी रुपयांचे उत्पन्न एकट्या पुणे जिल्ह्याने मिळवून देत महसूल स्थानी अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
राज्यात ‘एसटी’चे छत्रपती संभाजी नगर, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती असे सहा विभाग आहेत. या सहा विभागांमधून नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक बसचा प्रवास पुणे विभागातून करण्यात आला आहे.
पुणे विभागात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे अशा पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे विभागात (पाच जिल्हे मिळून) सर्वाधिक २३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुणे विभागातही पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक ५६ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न परिवहन विभागाला मिळाले आहे.
हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक, ‘आरटीओ’ कारवाई करणार ?
यंदा भाडेवाढ नसताना नोहेंबर महिन्यात मिळालेले उत्पन्न हे वर्षभरातील महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक आणि विक्रमी आहे. ‘एसटी’वर सर्वसामान्य प्रवाशांनी दाखवलेले विश्वासाचे द्योतक आहे – डॉ. माधव कुसेकर, ‘एसटी’ महामंडळाचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक
विभागनिहाय उत्पन्न
छत्रपती संभाजीनगर – २०४ कोटी ०८ लाख ४९ हजार
मुंबई – १४३ कोटी ७८ लाख ८६ हजार
नागपूर – ८८ कोटी ९७ लाख ८७ हजार
पुणे – २३० कोटी ७७ लाख ५८ हजार
नाशिक – १८१ कोटी ८४ लाख ३४ हजार
अमरावती – ९२ कोटी ०७ लाख ३६ हजार
© The Indian Express (P) Ltd