पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बसची (ई-बस) संख्या वाढत असल्याने महामंडळाने आळंदी, दापोडी, इंदापूर आणि मंचर या चार ठिकाणी नवीन चार्जिंग स्थानके उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विभागाकडे ६६ ई-बस असून, केवळ दोन चार्जिंग स्थानके असल्याने गैरसोय आता टळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य सरकारने ‘ई-शिवाई’ ही बससेवा सुरू केली आहे. पुणे विभागाकडे सध्या ६६ ई-शिवाई बस आहेत. पुणे ते छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर या मार्गावर ई-शिवाई बससेवा देण्यात येत आहे. या ई-बससाठी केवळ स्वारगेट आणि शंकरशेठ रस्ता या दोन ठिकाणीच चार्जिंग स्थानके आहेत. आता आळंदी, दापोडी, इंदापूर आणि मंचर या ठिकाणी स्थानके सुरू होणार आहेत.

हेही वाचा – कुंभमेळ्यानिमित्त पुण्यातून विशेष रेल्वे… कोणत्या मार्गे आणि केव्हा धावणार ?

u

याबाबत पुणे विभागाचे विभागीय अधिकारी सचिन शिंदे म्हणाले, ‘राज्य सरकारकडे नवीन चार्जिंग स्थानके सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने आळंदी, दापोडी, इंदापूर आणि मंचर या ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारली जाणार आहेत.’

चार्जिंग स्थानकांंमध्ये अतिउच्च दाबाचा विद्युतपुरवठा आवश्यक आहे. त्यासाठी महावितरणबरोबर करार करण्यात आला आहे. ही स्थानके लवकरच कार्यान्वित होणार असल्याने प्रवाशांना ‘ई-शिवाई’ बसची सेवा वेळेत उपलब्ध होईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

एक बस चार्ज होण्यासाठी किमान एक ते दीड तासाचा कालावधी लागतो. मात्र, अचानक विद्युतपुरवठा खंडित झाल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास चार्जिंग स्थानक बंद पडते. अनेकदा असे प्रकार घडत असल्याने वेळापत्रकावर परिणाम होतो. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. चार्जिंग स्थानकांंची संख्या वाढणार असल्याने प्रवाशांना वेळेत सेवा पुरविली जाणार आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री आले.. अन् वाहतूक कोंडी करून गेले

काय होणार फायदा?

  • अतिउच्च दाबाची विद्युत यंत्रणा वापरली जाणार असल्याने बस चार्जिंग वेगाने होणार
  • ई-शिवाई बसची सेवा प्रवाशांना वेळेत मिळणार

पुणे विभागासाठी २०० ई-शिवाई मंजूर आहेत. नवीन वर्षात टप्प्याटप्प्याने ई-शिवाई बसची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे ई-चार्जिंग स्थानकांंची संख्या वाढविणे गरजेचे झाले आहे. त्या अनुषंगाने चार नवीन चार्जिंग स्थानके सुरू होणार आहेत. आणखी चार्जिंग स्थानके उभारण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येत आहे. – सचिन शिंदे, पुणे विभागीय अधिकारी, एसटी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St electric bus e shivai pune division new charging stations pune print news vvp 08 ssb