पुणे : स्वारगेट बस स्थानकामधील नादुरुस्त बसचा वापर अनैतिक कृत्यांसाठी केला जात असल्याचे निवेदन ‘एसटी’ कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच एसटी महामंडळाच्या विभागीय प्रशासनाला दिले होते, असा दावा आता करण्यात येत आहे. एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात ५० हून अधिक नादुरुस्त बस उभ्या असल्याने, तेथील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्वारगेट स्थानकातील नादुरुस्त बसचा गैरवापर होत असल्याबाबत सांगण्यात आले होते. तसेच स्वारगेट-कात्रज रस्त्यावरील हाॅटेल पंचमी शेजारी असणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचारी वसाहतीमधील काही इमारती मोडकळीस आल्याने निर्मनुष्य करण्यात आल्या असून, या इमारती काही अज्ञात व्यक्तींची आश्रयस्थाने बनली आहेत. भविष्यात तेथेही गंभीर घटना घडू शकते, असे निवेदन विभागीय नियंत्रकांना देण्यात आले होते,’ अशी माहिती एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप परब यांनी दिली.

‘महामंडळाच्या निर्मनुष्य इमारतींमध्ये मागील बाजूने अज्ञात व्यक्ती बेकायदा प्रवेश करतात. तेथे दारू, गांजा, सिगारेटचे सेवन करतात. रात्रीच्या वेळी अश्लील चाळे सुरू असतात. याबाबत विरोध केल्यास स्थानिक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना धमकावणे, दादागिरी करणे असे प्रकारही होत असल्याने पोलीस स्थानकामध्ये तक्रार करून पोलिसांची गस्त वाढवावी,’ अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती.

स्वारगेट बस स्थानकातील नादुरुस्त बसचा गैरवापर होत असल्याचे कळवून गंभीर घटना घडू नये म्हणून तातडीने कारवाई करावी, असे विभागीय प्रशासनाला सूचित करण्यात आले होते, असे ‘एसटी’ कामगार संघटना, पुणेचे अध्यक्ष दिलीप परब यांनी सांगितले.