शासनाकडील प्रलंबित मागण्यांसाठी एसटीच्या सर्व ठिकाणच्या आगारांमध्ये कर्मचाऱ्यांनी सोमवारी निदर्शने केली. एसटीच्या शंकरशेठ रस्त्यावरील विभागीय कार्यालयातही महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास दिवाळीपूर्वी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
राज्य शासनाकडे अनेक दिवस प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दैनंदिन काम सुरू ठेवून कामगारांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. वेगवेगळ्या सवलतीपोटी राज्य शासनाकडून एसटीला सुमारे दोन हजार कोटी रुपयांहून अधिक येणे आहे. थकबाकीची ही रक्कम त्वरित देण्यात यावी. करारानुसार कामगारांना दिवाळीपूर्वी सर्व थकबाकी देण्यात यावी. जानेवारी २०१३ पासूनचा आठ टक्के व जुलै २०१३ पासूनचा दहा टक्के महागाई भत्ता लागू करावा. भविष्य निर्वाह निधीची उचलही वेळीच मिळावी. मंजुरीप्रमाणे कामगारांची नेमणूक करावी, या प्रश्नांकडे संघटनेचे दिलीप परब यांनी लक्ष वेधले.
अनुत्पादक फेऱ्यांची सक्ती करू नये. समांतर वाहतुकीवर बंदी करावी. त्याचप्रमाणे चांगल्या स्थितीतील गाडय़ा वेळेवर दिल्या जाव्यात, अशी मागणी संघटनेचे पुणे विभागाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केली. कामगारांच्या आंदोलनाची शासनाने वेळीच दखल घ्यावी, अन्यथा दिवाळीपूर्वी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा