पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) ताफ्यात ४० नवीन ‘लालपरी’ दाखल झाल्या आहेत. परिणामी एसटी’महामंडळाकडून वातानुकुलित ई-बसचे नियोजन करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या पुणे-मुंबई या मार्गावर धावणाऱ्या ई-बस (शिवशाही -वोल्व्हो) सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. बारामती आगारातून परळ मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या दोन बस आणि इंदापूर आगारातून परळ आणि बोरिवली मार्गावर प्रत्येकी दोन बसचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती ‘एसटी’ महामंडळाकडून देण्यात आली.

पुणे विभागातील एसटी महामंडळाच्या १४ आगारातून आंतरराज्यीय ठिकाणी बस धावतात. ‘एसटी’च्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे. मात्र, एसटी’ महामंडळातील आयुर्मान संपलेल्या ३०० हून अधिक बसचे टप्प्याटप्प्याने मोडीत काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत ७२ शिवनेरी आणि शिवशाही बस मोडीत काढण्याची प्रक्रिया पार पडली आहे, तर ४० नवीन”लालपरी’ बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आयुर्मान संपलेल्या बस मुंबईच्या मार्गावरून धावताना प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) या बसवर कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे मागील एक वर्षापासून बारामती, इंदापूर आगारातून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या काही बसची सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, नवीन बस दाखल झाल्याने वातानुकुलित ई-बसचे नियोजन करून एसटी’ महामंडळाने ही सुविधा वर्षभरानंतर पुन्हा सुरू केली आहे, तर इतर मार्गांवरील फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

या आगारातून मुंबईच्या दिशेने फेऱ्या सुरू

पुणे विभागातील ‘एसटी’ महामंडळाच्या बारामती आगारातून परळ मार्गावर, तर इंदापूर आगारातून परळ आणि बोरिवली मार्गावर ‘एसटी’ चे मार्गक्रमण आहे. मात्र मागील एक वर्षापासून ही सेवा बंद असताना एसटी’ महामंडळाने नियोजन करून बारामती ते परळ ही वातानुकुलित ई-बसची फेरी सुरू केली आहे तर इंदापूर आगारातून परळ आणि बोरिवली या प्रत्येकी दोन (येणाऱ्या आणि जाणाऱ्या) मार्गांवर सेवा पूर्ववत केली आहे.

नवीन ४० ‘एसटी’ या मार्गावर धावणार

  • बारामती आगार – सासवड,पुणे मार्ग (८) आणि बेळगाव (१)
  • इंदापूर आगार – तुळजापूर (४), उमरगा (४), परळी (२)
  • शिवाजीनगर आगार – भीमांशंकर (५), इंदोर (२), त्र्यंबकेश्वर (२) आणि बीड (१)
  • स्वारगेट आगार – बीदर (४), उद्गीर (४) आणि गुलबर्गा (२)
  • सर्व बस येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गानुसार नियोजन आहे.

बारामती आगारातून धावणारी पुणे मुंबई शिवशाही (ई-बस) ही वातानुकुलित सेवा मागील वर्षभरापासून बंद होती. पुणे विभागातील आगारांसाठी ४० ‘एसटी’ नव्याने दाखल झाल्याने वातानुकुलित बसचे नियोजन करून मुंबई मार्गावर धावणारी ‘एसटी’ सेवा सुरू करण्यात आली आहे, तर आंतरराज्यीय स्तरावरील ‘एसटी’च्या फेऱ्यांचे नियोजन करून एसटी फेऱ्या सुरू झाल्या आहेत. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील ‘एसटी’ दाखल होतील.

सचिन शिंदे, विभागीय अधिकारी, एमएसआरटीसी, पुणे.