शिवाजीनगर एसटी स्थानक मुळा रस्त्यावरील कृषी महाविद्यालयाच्या जागेत

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेवर ‘मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब’ उभारण्यात येणार आहे. हे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार असल्यामुळे शिवाजीनगर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे बसस्थानक मुळा रस्त्यावरील कृषी महाविद्यालयाच्या जागेत पुढील दोन वर्षांसाठी स्थलांतरित होणार असल्याची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

मेट्रोच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मार्गिका प्रस्तावित आहेत. यातील स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिकेचा शिवाजीनगरपासून स्वारगेटपर्यंतचा मार्ग भुयारी असणार आहे.

राज्य परिवहन महामंडळ, पीएमपी आणि रेल्वे स्थानक शिवाजीनगर परिसरात असल्यामुळे या ठिकाणी मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब प्रस्तावित आहे.

या ट्रान्सपोर्ट हबचे काम महामेट्रोकडून येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येणार असल्यामुळे शिवाजीनगर बसस्थानक पुढील दोन वर्षांसाठी स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती शिवाजीनगर-स्वारगेट भुयारी मार्गाचे कार्यकारी संचालक प्रमोद अहुजा यांनी दिली. मुळा रस्ता येथील कृषी महाविद्यालयाची जागा बसस्थानकासाठी निश्चित करण्यात आली आहे.

ही जागा साडेतीन हेक्टर असून नोव्हेंबर महिन्यात या जागेवर प्राथमिक कामे सुरू करण्यात येतील. दोन महिन्यांत प्राथमिक कामे पूर्ण झाल्यानंतर नव्या वर्षांत बसस्थानक स्थलांतरित करण्यात येणार आहे. दरम्यान, स्वारगेट येथेही भुयारी स्थानकाचे काम महामेट्रोकडून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वारगेट स्थानकाचेही स्थलांतर करावे लागणार आहे.

स्वारगेट पाणीपुरवठा केंद्राच्या जागेत स्वारगेट बसस्थानक स्थलांतरित करण्यात येण्याची शक्यता आहे. ही जागा महापालिकेच्या मालकीची असून महापालिकेकडून सध्या तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. स्वारगेट परिसरातील पदपथ आणि आसपासच्या अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पुढील महिन्यापर्यंत स्वारगेट बसस्थानक स्थलांतरित करण्याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे.