स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (एसएससी) परीक्षा या पुढे ऑनलाइन होण्याची शक्यता आहे. या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने त्यांचा अहवाल सादर केला असून या परीक्षांसाठी उणे मूल्यांकनही सुरू करण्याची शिफारस या समितीने केली आहे.
केंद्र शासनाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने एसएससीच्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी समिती नियुक्त केली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य आय एम जी खान यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीने त्यांचा अहवाल नुकताच सादर केला आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाइन करण्यात याव्यात अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. परीक्षांचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून ते निकालापर्यंतचे सर्व टप्पे ऑनलाइन व्हावेत आणि अहवालाला मंजुरी मिळल्यानंतर लवकरात लवकर या शिफारसी अमलात याव्यात असे या अहवालात म्हणण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या परीक्षांसाठी उणे मूल्यांकन सुरू करण्यात यावे. परीक्षा झाल्यानंतर परीक्षेची उत्तरसूची जाहीर करण्याच यावी, असेही या अहवालात म्हणण्यात आले आहे.
या शिवाय परीक्षांचे वेळापत्रक परीक्षेपूर्वी पुरेसा वेळ देऊन जाहीर करण्यात यावे आणि त्याची अंमलबजावणी व्हावी. परीक्षांना मिळाणारा प्रतिसाद वाढण्यासाठी त्यांची वृत्तपत्रे, एफएम चॅनल्स, दूरचित्रवाणी वाहिन्या, होर्डिग्ज, सोशल नेटवर्किंग साईट्स अशा तरुणांना जोडल्या जाणाऱ्या माध्यमातून जाहिरात करण्यात यावी. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत वापरण्यात यावी. शारीरिक चाचणीचा तपशील डिजिटलायझेशन करण्यात यावा. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या परीक्षांबाबतही या समितीने सुधारणा सुचवल्या आहेत. बारावी या प्राथमिक पात्रतेपेक्षा कमी पात्रता असलेल्या पदांच्या परीक्षा घेण्यात येऊ नयेत, असे या अहवालात म्हटले आहे.
या अहवालावर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सूचना मागवल्या असून विभागाच्या संकेतस्थळावर हा अहवाल उपलब्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा