पुणे : सारे प्रेक्षकांसमोर सादर व्हावे, अशीच मानसिकता असलेल्या पुणे महापालिकेच्या पारदर्शी कारभाराचे वास्तव समोर आले आहे. नाटक सुरू होण्याचे आणि संपण्याचे सूचन करण्यासाठी वापरला जाणारा पडदा नादुरुस्त झाल्यामुळे घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमध्ये ‘पडद्या’विना नाटकाचा प्रयोग करण्याची वेळ रंगकर्मींवर आली आहे. येथील पडद्याची यंत्रणा निकामी झाली असून निधीअभावी दुरुस्ती रखडल्याची सबब अधिकारी देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतर नाट्यगृहांप्रमाणे नेहरू भवनमध्येही पडदा हलविण्यासाठी यांत्रिक सोय उपलब्ध आहे. परंतु, त्या यंत्रणेतच बिघाड झाल्याने या पडद्याचा वापर होऊ शकत नाही. दोन व्यक्तींनी दोरी धरून ओढली तरच पडदा खेचला जाऊ शकतो. मात्र, हा पर्याय व्यवहार्य नसल्याने कलाकार त्याचा अवलंब करत नाही. २३ जानेवारीपासून येथे हिंदी राज्य नाट्य स्पर्धा रंगणार आहे. त्यापूर्वी यंत्रणा दुरुस्त करावी, अशी विनंती करणारे पत्र स्पर्धेचे समन्वयक राहुल लामखडे यांनी नाट्यगृह व्यवस्थापकांना दिले. मात्र, निधी नसल्याचे कारण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. नाटकाच्या प्रकाशयोजनेसाठी वापरले जाणारे या नाट्यगृहातील लाइट बारही नादुरुस्त आहेत. त्यावर दिवे अडकवता येत असले तरी ते वर-खाली करण्याच्या सुविधेत बिघाड झाला आहे. हा बिघाडही दुरुस्त करण्याची मागणी कलाकारांनी केली आहे.

महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या या नाट्यगृहात एरवी अभावानेच नाट्यप्रयोग होतात. मात्र, दरवर्षी खासगी नाट्यगृहात भरवली जाणारी राज्य नाट्य स्पर्धा यंदा पालिकेच्या नाट्यगृहात भरवली जात आहे. या निमित्ताने येथे नाट्यप्रेमींची वर्दळ पाहायला मिळेल. या स्पर्धेदरम्यान कलाकारांना चांगल्या सुविधा मिळाल्या, तर भविष्यात येथे नाटकाचे प्रयोग करतील आणि नाट्यगृह गजबजलेले राहील. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करत कलाकारांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी कलाकारांकडून करण्यात येत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन नाट्यगृहातील सुविधांची दुरुस्ती अनेक महिन्यांपासून झाली नाही. मुख्य पडदा बंद आहे. प्रकाशयोजना करण्यासाठी लाइट बार नादुरुस्त आहेत. इतर कार्यक्रम पडद्याशिवाय होऊ शकतात. पण, नाटक कसे करणार?

– राहुल लामखडे, समन्वयक, राज्य नाट्य स्पर्धा समन्वयक

नाट्यगृहातील पडद्याच्या यंत्रणेत बिघाड असल्याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाला कळवले आहे. मात्र, सध्या निधी उपलब्ध नसल्याने दुरुस्ती होऊ शकत नसल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले.

– मधुकर मुंडलिक, नाट्यगृह व्यवस्थापक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stage drama without screen in pune system failure at nehru cultural bhawan pune print news ysh