पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) यांच्यातील वादामुळे रखडलेला शिवाजीनगर येथील जुन्या एसटी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही विभागांमध्ये समेट घडवून आणण्यात आला असून, या प्रकल्पासाठी ‘एमएसआरटीसी’ आणि महामेट्रो यांच्यात येत्या आठवडाभरात करार करण्यात येणार आहे. ६०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन मे महिन्यात होणार असून, तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवाजीनगर येथील एसटी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बुधवारी आढावा बैठक पार पडली. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, दूरदृश्य प्रणालीद्वारे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर, नगरविकास विभागाचे सहसचिव विजय चौधरी उपस्थित होते.

शिवाजीनगर येथील जुन्या बसस्थानकाची जागा महामेट्रोने पुनर्बांधणीसाठी ताब्यात घेतली आहे. महामेट्रोकडून बसस्थानकाच्या सुविधांबाबत आराखडादेखील तयार करण्यात आला आहे. मात्र, प्रवाशांच्या सुविधा, अत्याधुनिक पद्धतीचे बसस्थानक, वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष आणि इतर सुविधा देण्याची मागणी महामंडळाकडून करण्यात आली. त्यावरून दोन्ही विभागांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते. हा प्रकल्प महत्त्वाचा असून, विकसकाशी ९९ वर्षांचा करार करावा लागणार आहे. त्यासाठी संबंधित प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याचा आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला.

‘पीपीपी’ तत्त्वावर प्रकल्प

महामेट्रोकडून सार्वजनिक, खासगी, भागीदारी (पीपीपी) तत्त्वानुसार हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ६०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवून मे महिन्यापर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. शिवाजीनगर बसस्थानक मूळ जागी येण्यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

नागरिकांच्या मागणीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजीनगर बसस्थानकाच्या मूळ जागेबाबत पाठपुरावा करण्यात येत होता. त्या दृष्टीने उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतलेल्या बैठकीत अत्याधुनिक सुविधांयुक्त बसस्थानक उभारण्याचा आदेश देण्यात आला आहे. मे महिन्यात बसस्थानकाच्या प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन होईल. पुढील तीन वर्षांत बांधकाम पूर्ण होईल.
सिद्धार्थ शिरोळे, आमदार

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

अत्याधुनिक बसस्थानकासोबतच व्यावसायिक संकुलाची उभारणी

वाहनतळासाठी दोन तळघरे

किरकोळ विक्रीसाठी ‘सेमी बेसमेंट’

बसआगार पहिल्या मजल्यावर आणि बसवाहनतळ दुसऱ्या मजल्यावर

शासकीय व खासगी कार्यालयांसाठी १६ मजली इमारत

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stalled shivajinagar st bus stand reconstruction delayed by dispute will resume soon pune print news vvp 08 sud 02