राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची यंत्रणा सोमवारपासून क्लाउड म्हणजेच केंद्रीय माहिती साठवणूक प्रणालीनुसार (सेंट्रलाइज डाटा स्टोरेज सिस्टिम) कार्यान्वित करण्यात आली. रविवारी सुट्टीच्या दिवशी काही कार्यालयांत प्रायोगिक तत्त्वावर कामकाज करण्यात आले होते. राज्यभरातील पाचशे कार्यालयांमध्ये क्लाउडनुसार काम सुरू झाले आहे. दरम्यान, क्लाउडनुसार कामकाज करताना तांत्रिक अडचणी येत असून येत्या आठवडाभरात कामकाज सुरळीत सुरू होण्याचा दावा विभागाकडून करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्य़ात प्रायोगिक तत्त्वावर क्लाउडवर कामकाजाला सुरुवात करण्यात आली होती. पुढील टप्प्यात जास्त दस्तनोंदणी असणाऱ्या जिल्ह्य़ांमध्ये अशा पंधरा जिल्ह्य़ांमध्ये क्लाउडवर कामकाज नेण्यात आले. १ जानेवारीपासून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आणि राज्यातील सातबारा उताऱ्यांचे कामकाज क्लाउडवर सुरू करण्यात आले आहे.