पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली असून, स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत महायुतीच्या काही माजी नगरसेवकांच्या प्रभागात १२ कोटी ६० लाख रुपयांचा निधी वळविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सांडपाणी वाहिन्या टाकणे, रस्ते दुरुस्ती अशा कामांसाठी हा निधी वापरला जाणार आहे.

महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महापालिकेची निवडणूक रखडली आहे. त्यामुळे महापालिकेत प्रशासक राज आहे. महापािलकेच्या अंदाजपत्रकामध्ये विविध विभागांसाठी तरतूद केली जाते. आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी अडीच महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे ज्या कामासाठी तरतूद केली आहे आणि तिचा वापर झाला नाही, असा निधी अन्य कामांसाठी वळविण्याबाबतचे प्रस्ताव (वर्गीकरण प्रस्ताव) स्थायी समितीपुढे ठेवले जात आहेत. प्रशासनाबरोबरच राजकीय पदाधिकाऱ्यांकडूनही तसे प्रस्ताव दिले जात आहेत. प्रशासक आणि आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत १२ कोटी ६० लाखांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. हे सर्व प्रस्ताव महायुतीच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागातील कामांचे आहेत.

हेही वाचा >>>महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून अतिरिक्त निधी; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

या प्रभागांतील कामे समाविष्ट गावातील सांडपाणी प्रकल्प आणि पाणीपुरवठ्याच्या शिल्लक निधीतून करण्यात येणार आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात ३८ कोटी रुपयांच्या वर्गीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. हा निधी बाणेर आणि बालेवाडी येथील कामांसाठी मंजूर करण्यात आला होता.

कुठे, किती निधी?

प्रभाग क्रमांक ३ (विमाननगर-सोमनाथनगर) – ६० लाख रुपये

प्रभाग क्रमांक ८ (औंध-बोपोडी) – १ कोटी

प्रभाग क्रमांक ९, १२ (बाणेर, बावधन, रामबाग काॅलनी, मयूर काॅलनी) – ४ कोटी ५ लाख रुपये

प्रभाग क्रमांक १३ (एरंडवणे) – ५० लाख रुपये

प्रभाग क्रमांक १७ (रास्ता पेठ-रविवार पेठ) – १ कोटी रुपये

प्रभाग क्रमांक १८ (खडकमाळ आळी) – १ कोटी ७५ लाख रुपये

प्रभाग क्रमांक १८ (लोहियानगर-कासेवाडी) – १ कोटी २५ लाख रुपये

प्रभाग क्रमांक २४ (रामटेकडी) – ५० लाख रुपये

प्रभाग क्रमांक २९ (नवी पेठ, पर्वती) – २ कोटी रुपये

प्रभाग क्रमांक ३१ (कर्वेनगर) ५० लाख रुपये

समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा विषयक कामे आणि सांडपाणी वहन व्यवस्थेसंदर्भात या निधीतून कामे होणार आहेत. मंजूर करण्यात आलेल्या वर्गीकरणांच्या प्रस्तावाचा राजकीय संबंध नाही. चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील तरतुदीमधून कामे होणार आहेत. महापालिका प्रशासनाकडे प्रभागांत विविध कामे करण्यासंदर्भात पत्रव्यवहार झाले आहेत. त्याचा विचार पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात केला जाईल.- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका

Story img Loader