खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत मेट्रो मार्गिकांच्या विस्तारीकरणाची मागणी होत असतानाच आता स्वारगेट ते खडकवासला अशी मेट्रो मार्गिका सुरू  करावी, अशी मागणी सुरू झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मार्गिकांची कामे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) कडून सुरू झाली आहेत. ही कामे सुरू झाल्यानंतर मेट्रो मार्गिकांचे विस्तारीकरण करण्याची मागणी सुरू झाली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेचे कात्रजपर्यंत विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठीची हवाई सर्वेक्षणाची प्रक्रियाही महामेट्रोकडून सुरू झाली असून येत्या काही दिवसांमध्ये त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) करण्यात येणार आहे. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडूनही शिवाजीनगर-हिंजवडी या मार्गिकेचे हडपसपर्यंत विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर स्वारगेट ते खडकवासला मेट्रो मार्गिका करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

खडकवासला हे गाव येथील धरण, त्यापुढील सिंहगड किल्ला, पानशेत, वरसगाव ही धरणे, आणि एकूणच या परिसरातील निसर्ग संपदा यामुळे या भागात पर्यटकांची बारमाही गर्दी असते. याशिवाय गेल्या काही वर्षांत या भागात वाढलेली नागरी लोकसंख्या, तेथून नोकरी व्यवसायानिमित्त रोज पुणे शहरात ये-जा करणारा नोकरदार वर्ग, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, रुग्णालये आणि अन्य कारणांसाठी ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना रोजच्या रोज पुण्यात यावे लागते. या सर्वाची खूप मोठी संख्या आहे. त्यांच्या सोयीसाठी स्वारगेट ते खडकवासला दरम्यान मेट्रो सुरू करावी.

खडकवासला येथे मेट्रोचे जंक्शन करावे, असे सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Start from swargate to khadakwasla metro line supriya sule