पुणे : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची शनिवारी (१८ नोव्हेंबर) तातडीची आणि महत्त्वाची बैठक पुण्यात होणार आहे. या बैठकीत आयोगाच्या कामकाजात वाढता शासकीय हस्तक्षेप, मागास प्रवर्गातील जातींच्या हक्कावर होणारे परिणाम यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. ही बैठक सकाळी ११.३० वाजता व्ही.व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृहात होणार आहे.
निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे हे आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारची बैठक पार पडणार आहे. निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, ॲड. बालाजी किल्लारीकर, प्रा. डॉ. संजीव सोनवणे, प्रा. डॉ. गजानन खराटे, डॉ. नीलिमा सरप (लखाडे), प्रा. डॉ. गोविंद काळे, प्रा. लक्ष्मण हाके आणि ज्योतीराम चव्हाण हे आयोगाचे सदस्य आहेत. आ. उ. पाटील हे सदस्य सचिव आहेत. बैठकीत मागील सभेचे इतिवृत्त वाचून अंतिम करणे, कार्यवाही पूर्ण झालेले अहवाल आयोगाच्या स्वाक्षरीसाठी सादर करणे, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड) या प्रवर्गास वाढीव आरक्षण देण्याबाबत प्राप्त निवेदनांवर निर्णय घेणे, आयोगाच्या कार्यालयातील रिक्त असलेल्या उच्चश्रेणी लघुलेखक पदावर कंत्राटी पद्धतीने लघुलेखकाची नियुक्ती करणे, जातपडताळणी समिती व इतर अर्धन्यायीक न्यायाधिकरणांच्या कामकाजात वाढता शासकीय हस्तक्षेप आणि मागास प्रवर्गातील जातींच्या हक्कावर होणारे परिणाम, आयोगाच्या विभागीय समित्यांकडे सोपविलेल्या प्रकरणांच्या सद्य:स्थितीबाबत चर्चा आणि आढावा, तसेच अध्यक्षांच्या अनुमतीने आयत्या वेळेसचे विषय या विषयांवर बैठकीत चर्चा केली जाणार आहे, असे आयोगाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा >>>पुणे: पश्चिम भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद
दरम्यान, मराठा आरक्षण मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ आंदोलनकर्त्यांकडे मागितला होता. त्यानुसार आता शासकीय पातळीवरून हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाला १३ नोव्हेंबरला पत्र पाठविले आहे. त्यानुसार या बैठकीत मराठा समाज मागास आहे किंवा कसे? याची चाचपणी करण्यात येणार आहे.