टिळक रस्त्यावर असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी बॅंकेतील सर्व कॉम्प्युटर आणि इतर साहित्य जळून खाक झाले. बॅंकेतील रोकड असलेली स्ट्रॉंग रुम मात्र आगीच्या झळांतून वाचली.
बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास बॅंकेतून धूर येत असल्याचे दिसल्यावर सुरक्षारक्षकाने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशामक दलाला माहिती कळविल्यावर आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे दहा बंब घटनास्थळी पोहोचले. सकाळी आठच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. बॅंकेची शाखा असलेल्या इमारतीत पुणे महापालिकेचे टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयही आहे. त्यालाही या आगीची काही प्रमाणात झळ पोहोचली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
(संग्रहित छायाचित्र)