राज्यातील सहकारी संस्थाची शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेमध्ये तब्बल ३० वर्षांनंतर सेवक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्या अंतर्गत शनिवारी ८६ उमेदवारांना नेमणुकीची पत्रे देण्यात आली.या भरती प्रक्रियेत २४२ जागांसाठी राज्यातून सुमारे ५१५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आय.बी.पी.एस. या बँकिंग क्षेत्रातील केंद्रीय संस्थेकडे लेखी परीक्षेचे आयोजन दिले होते. मुलाखती, समूह चर्चा इत्यादी चाचण्यांनतर एकूण १३५ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. त्यापैकी पहिल्या यादीत निवड झालेल्या ८६ उमेदवारांना नेमणुकीची पत्रे देण्यात आली. निवड करण्यात आलेले सर्व उमेदवार उच्चशिक्षित असून, त्यामध्ये आठ उमेदवार बी.टेक , एम.टेक, ३१ उमेदवार स्थापत्य, संगणक अभियंता आणि दहा उमेदवार कृषी पदवीधर आहेत, असे बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
हेही वाचा >>>पुणे: सनदी लेखापाल अभ्यासक्रमात पुढील वर्षी बदल; भारतीय राज्यघटनेचा अभ्यासक्रमात समावेश
नवीन नेमणूक झालेल्या या उमेदवारांना प्रथम १२ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. त्यामध्ये राज्य बँकेच्या व्यवसायानुषंगाने विविध विभागात होणाऱ्या कामकाजाची माहिती, प्रत्यक्ष काम याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली तेव्हा बँकेची एकूण सेवक संख्या १८४२ होती. सेवक निवृत्ती आणि बँकेने राबविलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेमुळे सध्याची सेवक संख्या ६४३ इतकी आहे. मात्र, सन २०११ पासून प्रशासकाच्या नेमणुकीनंतर बँकेचा एकूण व्यवसाय २८ हजार ४१८ कोटी रुपयांवरुन ४७ हजार २७ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, असेही अनास्कर यांनी सांगितले.