पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्यास डिसेंबर २०२३ पासून सुरुवात करण्यात आली. मात्र, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या नसल्याने विद्यार्थी उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्यात अनियमितता असल्याचे निदर्शनास आले असून, विद्यार्थी उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्याबाबत कार्यवाही करून त्याबाबत आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक राहुल रेखावार यांनी याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी, महापालिका-नगरपालिकांचे प्रशासन अधिकारी, शिक्षण निरीक्षकांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या. शिक्षण क्षेत्रातील माहितीचे संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया वेगवान, सुलभ होण्यासाठी, धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरांवरील प्रशासकांसह भागधारकांना विदा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करणे, राज्य, जिल्हा, तालुका पातळीवरील गरजा लक्षात घेऊन उपक्रम, योजना आखण्यास मदत होण्यासाठी एससीईआरटीमध्ये विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती स्विफ्ट चॅट या उपयोजनातील स्मार्ट उपस्थिती या बॉटद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्यास डिसेंबर २०२३पासून सुरुवात करण्यात आली. मात्र, जिल्हास्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत याबाबत नियमित आढावा, सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्यात अनियमितता दिसून आली.

हेही वाचा…राज्यातील निरक्षरांचे पुन्हा सर्वेक्षण… किती नोंदणी करण्याचे उद्दिष्ट?

या पार्श्वभूमीवर, सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या बॉटवर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवण्याचे आदेश देऊन उपस्थिती नियमितपणे नोंदवली जात असल्याचा आढावा घेण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.