पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत, त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती अन्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमधून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा ११ ते १८ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. सुमारे ३१ लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर, कॉपी रोखण्यासाठी राज्य मंडळाने निर्देश दिले आहेत. सध्याच्या पद्धतीनुसार परीक्षा केंद्रावर त्याच शाळांतील शिक्षक केंद्र संचालक, पर्यवेक्षक किंवा परीक्षेशी संबंधित काम करतात. मात्र, आता यात बदल करण्यात आला आहे.

हे ही वाचा… दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी? शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की कॉपीमुक्त परीक्षांसाठी पुढील पाऊल टाकण्यात आले आहे. केंद्र संचालक, पर्यवेक्षक किंवा परीक्षेशी संबंधित कर्मचारी अन्य शाळांतून नियुक्त करण्याचा निर्णय राज्यस्तरावरून पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्हास्तरावर, स्थानिक पातळीवर काही बदल करण्यात आले होते. आता राज्यभरातच बदल लागू केला जाणार आहे.

हे ही वाचा… महापालिका निवडणुकीची साखरपेरणी ! वर्गीकरणाचे १२ कोटी ६० लाख मंजूर, महायुतीला झुकते माप

कॉपीमुक्त परीक्षांसाठी जनजागृती सप्ताह

मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत, तसेच शिक्षणमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली २० ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यात २० जानेवारी रोजी कॉपीमुक्त अभियानाची शाळास्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापक यांना माहिती देणे, २१ कॉपीमुक्त अभियानाची शपथ, २२ जानेवारी रोजी कॉपी केल्यास होणाऱ्या शिक्षेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे, २३ जानेवारी रोजी परीक्षा काळातील आहार, आरोग्याच्या काळजीबाबत तज्ज्ञांद्वारे पालक, विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग, २४ जानेवारी रोजी तणावमुक्त वातावरणात परीक्षा देणे, उत्तरपत्रिका कशा लिहाव्यात याबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन, २५ जानेवारी रोजी कॉपीमुक्त अभियानाबाबत जनजागृती फेरी, २६ जानेवारी रोजी ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State education board decision about tenth and twelth regarding malpractice in examination pune print news ccp 14 asj