पुणे : विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा (सेट) ४ मे रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी या बाबतची माहिती परिपत्रकाद्वारे दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातर्फे सेट परीक्षा आयोजित करण्यात येते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (युजीसी नेट) धर्तीवर सेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती या पूर्वी विद्यापीठाकडून देण्यात आली होती. त्यामुळे सेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होण्याबाबत परीक्षार्थ्यांना उत्सुकता होती.
हेही वाचा…‘सारथी’कडून १ हजार ५०० तरुण-तरुणींसाठी संधी…, प्रशिक्षणार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतनही…
मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेप्रमाणे आतापर्यंत घेण्यात आलेल्या ३९ सेट परीक्षांप्रमाणेच ४०वी सेट परीक्षाही पारंपरिक ओएमआर पद्धतीचेच घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सेट परीक्षेसंदर्भातील सविस्तर वेळापत्रक अभ्यासक्रम आणि इतर अनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आली आहे. परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आल्यामुळे परीक्षार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.