पुणे : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील इन्स्पायर पुरस्कार मानक स्पर्धेत राज्याला सुवर्णपदक प्राप्त झाले. सातारा जिल्ह्यातील यश शिंदे या विद्यार्थ्याचा नावीन्यपूर्ण प्रकल्प या स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. केटरिंग व्यवसायाला पूरक ठरणारे ‘टचलेस प्लेटिंग’ हे उपकरण यश शिंदेने सादर केले होते.
दिल्लीत झालेल्या इन्स्पायर स्पर्धेच्या प्रदर्शनासाठी देशभरातील ५५६ विद्यार्थ्यांनी त्यांचे नावीन्यपूर्ण प्रकल्प मांडले होते. राज्यातील ३१ विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग होता. अंतिम साठ प्रकल्पांमध्ये साताऱ्याचा यश शिंदे, कोल्हापूरचा यश चौगुले, अनुष्का कांबळे, सांगलीची साधना भिलावडे, पुण्याची रिया गायकवाड, अमरावतीचा दुर्वेश कोंडेकर, बीडचा ओंकार शिंदे, जालन्याची संजीवनी पुरी, नागपूरचा आदित्य शिंगणे या नऊ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचा समावेश होता. त्यापैकी यश शिंदेचा प्रकल्प सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील परखंडी येथील यशने केटरिंग व्यवसायाला पूरक ठरणारा प्रकल्प साकारला. त्यात ताटे वाटणे, जेऊन झाल्यावर ताटे गोळा करणे, टेबल स्वच्छ करणे आदी कामे करणाऱ्या उपकरणाची निर्मिती यश आणि त्याचे शिक्षक प्रसाद यादव यांनी केली.
हेही वाचा : VIDEO: गोष्ट पुण्याची – पेशवे दरबारातील इंग्रजांच्या वकिलाचा ‘संगमावरचा बंगला’
महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळाल्याचा आनंद व्यक्त करून यश शिंदे म्हणाला, की शाळेच्या एका कार्यक्रमात जेवणासाठी ताटे लावत असताना मला या उपकरणाची कल्पना सुचली. त्यानंतर या उपकरणाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. माझ्या शिक्षकांना ही कल्पना सांगितली. जवळपास एक वर्ष काम केल्यावर हे उपकरण तयार झाले. या उपकरणासाठी सुवर्णपदक मिळाल्याचा अभिमान वाटतो.तर केटरिंग व्यवसायाला पूरक असे बहुउद्देशीय उपकरण तयार करण्यात आले. हे उपकरण सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले याचा आनंद आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली हे महत्त्वाचे आहे, असे यादव यांनी सांगितले.
मल्टीपर्पज केटरिंग मशीन बनवण्याचे काम साधारण एक वर्षापासून सुरू होते. राज्यभरातून एकूण २१ उपकरणांची निवड झाली होती. या प्रदर्शनात सुवर्णपदक मिळाल्याने खूप आनंद होत आहे. या उपकरणात आणखीन बदल करून प्रत्यक्ष निर्मितीसाठी एनआयएफ ही केंद्र शासनाची संस्था संस्था मदत करायला तयार आहे .- यश शिंदे, सुवर्णपदक विजेता विद्यार्थी.
असे आहे उपकरण
मल्टीपर्पज केटरिंग मशीन हे केटरिंग व्यवसायाची जेवणाची ताटे मांडणे, जेवणानंतर ते जमा करणे, टेबल स्वच्छ करणे ही अनेक कामे एकाच यंत्राद्वारे करता येतात. यामुळे रोग संक्रमण व इतर स्वच्छतेच्या समस्या उद्भवणार नाहीत. या उपकरणातील पुढील सुधारणा प्रत्यक्ष निर्मितीसाठी एनआयएफ ही केंद्र शासनाची संस्था मदत करणार आहे. पेटंट व निर्मितीसाठी मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहे.