कायदा हातात घेण्याचा प्रयत्न जर कोणी केला, तर ते अजिबात सहन केले जाणार नाही. तोडफोड करा हे सांगण्याची संस्कृती पुरोगामी महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर सोमवारी पुण्यामध्ये टीका केली. राज्यात कोणत्याही स्थितीत टोल रद्द करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी नवी मुंबईमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱयांना टोल न भरण्याचे आदेश दिले होते. टोल का वसूल केला जातोय, हे सांगितले जात नाही, तोपर्यंत पक्षाच्या पदाधिकाऱयांनी आणि सहकाऱयांनी टोल भरू नये. त्यांनी आपल्या गाड्या टोलनाक्यावरच लावून ठेवाव्या, असे राज ठाकरे म्हणाले. त्यांच्या या आदेशाचे पडसाद रविवारी रात्रीपासूनच महाराष्ट्राच्या विविध भागांत उमटण्यास सुरुवात झाली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातील टोलनाक्यांवर हल्ला करून तोडफोड केली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी अजित पवार यांना त्यांची प्रतिक्रिया विचारल्यावर ते म्हणाले, प्रक्षोभक भाषणं करणाऱयांवर कायद्याच्या चौकटीत कारवाई केली जाईल. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी केला तर अजिबात सहन केले जाणार नाही. राज्यापुरता टोल रद्द करता येईल का, याचा विचार आम्ही अगोदरच केला आहे. मात्र, ते शक्य नसल्याचे लक्षात आले. टोल रद्द करायचा झाल्यास विकासकामे १०० टक्के थांबवायला लागतील आणि ते शक्य होणार नाही. एकपदरी रस्त्यांवर घेतला जाणार टोल थांबवता येईल का, याची माहिती घेण्याचे आदेश मी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱयांना दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा