पुणे : राज्यात सुरू असलेले द्विलक्ष्यी (बायफोकल) अभ्यासक्रम बंद करून राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्यानुसार (एनएसक्यूएफ) शैक्षणिक वर्ष २०२४-२५पासून नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार होते. मात्र द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम कृती समितीने केलेल्या विरोधानंतर एनएसक्यूएफमध्ये रुपांतरित नवीन व्यवसाय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून राबवण्यात येणार आहेत.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने या बाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध केला. राज्यात तांत्रिक, कृषी, वाणिज्य, मत्स्य या गटातील १६ द्विलक्ष्यी अभ्यासक्रम राबवण्यात येतात. २० जून २०२३च्या शासन निर्णयानुसार १३ व्यवसाय अभ्यासक्रम एनएसक्यूएफशी सुसंगत करण्यात आले आहेत. तर मत्स्य गटातील दोन आणि तांत्रिक गटातील एक अभ्यासक्रम बंद करण्यात आला आहे. त्या शासन निर्णयानुसार एनएसक्यूएफ रुपांतरित द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२४-२५पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र या निर्णयामुळे दोन लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याचे, विद्यार्थिसंख्या कमी होऊ शिक्षकांना नोकरी गमवावी लागणार असल्याचे सांगत द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम कृती समितीने या निर्णयाला विरोध केला होता. तसेच या बाबत कौशल्यमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी चर्चा करून या निर्णयाचे दुष्परिणाम लक्षात आणून देण्यात आले. त्यानंतर नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांस कृती समितीचे डॉ. ए. पी. कुलकर्णी, प्रा. सुधीर गाडे, प्रा. वैजनाथ स्वामी यांचा समावेश होता. द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाला पर्याय म्हणून एनएसक्यूएफनुसार राज्यातील स्थितीला सुसंगत अभ्यासक्रम निर्मितीसाठी समिती तयार करण्यात आली. या समितीने इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र आणि मत्स्यपालन या तीन विषयांसाठी अभ्यासक्रम तयार करून राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेला मान्यतेसाठी पाठवले. तसेच उर्वरित १३ विषयांसाठीचा पाठपुरावाही करण्यात येत आहे.
हेही वाचा : मनगटापासून तुटलेला हात पुन्हा जोडला, ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून तरुणावर पुनर्रोपण शस्त्रक्रिया यशस्वी
या पार्श्वभूमीवर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार सद्यस्थितीत सुरू असलेले व्यवसाय अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थांना एनएसक्यूएफ रुपांतरित नवीन व्यवसाय अभ्यासक्रम शैक्षणिक २०२४-२५मध्ये राबवण्यास स्थगिती देण्यात येत आहे. हे अभ्यासक्रम ऐवजी २०२५-२६ पासून सुरू करता येतील, तसेच ज्या संस्थांना किंवा अधिकच्या तुकड्यांना विनाअनुदानित तत्त्वावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करायचे आहेत त्यांना एनएसक्यूएफ रुपांतरित व्यवसाय अभ्यासक्रम राबवणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.