पुणे : राज्य सरकारकडून येत्या ४ डिसेंबरपासून जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम राज्यभरात राबविण्यात येणार असली, तरी त्यातून पुणे शहर वगळण्यात आले आहे. कारण राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला जंतनाशक गोळ्यांचा पुरवठाच झाला नसल्याचे समोर आले आहे. गोळ्यांचा साठा नसल्याने ही मोहीम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा आदेश राज्य सरकारने पुणे महापालिकेला दिला आहे.
राज्य सरकारकडून राष्ट्रीय जंतनाशक दिनापासून म्हणजेच ४ डिसेंबरपासून ही मोहीम १६ आदिवासी जिल्हे आणि १९ महापालिकांमध्ये राबविण्यात येणार आहे. ही मोहीम १० डिसेंबरपर्यंत राबविण्यात येईल. या मोहिमेंतर्गत १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना शाळा आणि अंगणवाडी केंद्रावर अल्बेनडेझोल या जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. या मोहिमेसाठी गोळ्यांचा पुरवठा राज्य सरकारकडून केला जातो. या वेळी जिल्हा आरोग्य विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला गोळ्यांचा पुरवठा झाला. मात्र, पुणे महापालिकेला गोळ्यांचा पुरवठा करण्याआधी त्या गोळ्या खराब असल्याचा तपासणी अहवाल सरकारला मिळाला. त्यामुळे महापालिकेला गोळ्यांचा पुरवठा झाला नाही.
हेही वाचा…पुणेकरांसाठी खूशखबर! स्वतंत्र सरकारी कर्करुग्णालय उभे राहणार
ॉ
याबाबत महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे म्हणाले, की राज्य सरकारकडून गोळ्यांचा पुरवठा होणार होता. मात्र, त्या गोळ्या खराब असल्याचा तपासणी अहवाल आल्याने पुरवठा होऊ शकला नाही. राज्य सरकारकडून पुरवठा झाल्यानंतर जंतनाशक मोहीम राबविली जाईल. ही मोहीम ४ डिसेंबरपासून सुरू होणार नसली, तरी आमच्याकडे सध्या महापालिकेच्या दवाखान्यात येणाऱ्या मुलांना देण्यासाठी जंतनाशक गोळ्यांचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी गोळ्यांची टंचाई नाही.
गोळ्यांची आवश्यकता किती?
हेही वाचा…राहुल कलाटेंची ईव्हीएमबाबत शंका; २५ बूथवरील ईव्हीएमची होणार पडताळणी!
पुणे महापालिका – ४ लाख ५० हजार
पिंपरी-चिंचवड महापालिका – १ लाख ७० हजार
पुणे ग्रामीण – १ लाख ५० हजार
राज्य सरकारकडून वेळेत जंतनाशक गोळ्यांचा पुरवठा न झाल्याने जंतनाशक मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. ही मोहीम राबविण्याची पुढील तारीख राज्य सरकारच्या आदेशानुसार निश्चित केली जाईल. डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी राज्य सरकारकडून गोळ्यांचा पुरेसा पुरवठा झाला आहे. आमच्याकडे बुलडाण्यावरून गोळ्या पाठविण्यात आल्या आहेत. जंतनाशक मोहीम राबविण्याचे प्रशिक्षण अंगणवाडीसेविका आणि आशासेविकांना देण्यात आले आहे.
डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक