अद्याप कोणतीही कामे नाहीत; स्वतंत्र निधी देण्याबाबत कार्यवाही नाही

आज जागतिक पर्यटन दिन

राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने मार्च महिन्यात जुन्नर तालुक्याला विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले. त्यानुसार विकासाच्या दृष्टीने तालुक्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट – डीपीआर) तयार करून तालुक्यासाठी स्वतंत्र निधी देण्यात येणार होता. परंतु, अद्याप त्यादृष्टीने कोणत्याही प्रकारची कार्यवाही शासनाकडून करण्यात आली नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, सर्वाधिक साडेतीनशे लेणी असलेला पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक परिसर आणि महादुर्बिणीसारख्या वैज्ञानिक वैशिष्टय़ांनी नटलेल्या जुन्नर तालुक्याला राज्यातील पहिला पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे तालुक्याच्या पर्यायाने पुणे जिल्ह्य़ाच्या विकासाला गती मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. जुन्नरच्या पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्यादृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार होता. पर्यटन संचालनालय आणि पर्यटन विभागाच्या वतीने ही कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूदही करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात गेल्या सहा महिन्यात कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच जुन्नर तालुक्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (महाराष्ट्र टय़ुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) केंद्रही स्थापन करण्यात आले नसल्याचे चित्र समोर आले आहे.

‘शासनाने जुन्नर तालुक्याला पर्यटनाचा दर्जा दिला असून, त्यानुसार एमटीडीसीकडून विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. तालुक्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाबाबत शासनस्तरावरून आणि पर्यटन विभागाकडूनच कार्यवाही करण्यात येणार आहे. पर्यटनाच्यादृष्टीने तालुक्यातील विकासकामे करण्यासाठी संस्था नियुक्त करण्यात आली आहे. तसेच एमटीडीसीमधील तज्ज्ञांच्या सहकार्याने तालुक्याचा आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे.  जुन्नरमध्ये एमटीडीसीचे केंद्र सुरू करण्यासाठी दोन-तीन जागा पाहण्यात आल्या असून त्याबाबतचा अहवाल पर्यटन विभागाकडे या आठवडय़ात पाठविण्यात येणार आहे. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार टप्प्याटप्प्याने विकासकामे केली जातील’, अशी माहिती एमटीडीसी पुणे विभागाचे व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.

आज सायकल फेरी

जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसी पुणे विभागाकडून शनिवारवाडा ते लोहगाव येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयापर्यंत सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन दिनाचे महत्त्व, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी या सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी शनिवारवाडय़ापासून सकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे.