पुणे : राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) रुग्णसंख्या १२७ वर पोहोचली असून, आतापर्यंत दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, राज्याचे आरोग्य सचिव निपुण विनायक यांनी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत एका बैठकीत पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य सचिव निपुण विनायक हे गुरुवारी पुण्यात दाखल झाले. त्यांनी औंध जिल्हा रुग्णालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिली. या दोन्ही रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची पाहणी त्यांनी केली. याचबरोबर रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून माहिती घेतली. रुग्णांवरील उपचार आणि औषधांच्या उपलब्धतेबाबत त्यांनी डॉक्टरांना सूचना केल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आरोग्य सचिवांनी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेला भेट दिली. तिथे त्यांनी संस्थेतील शास्त्रज्ञ, शीघ्र प्रतिसाद पथक, केंद्रीय उच्चस्तरीय पथक आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ होण्यामागील कारणांबाबत त्यांनी एनआयव्हीतील शास्त्रज्ञांसोबत चर्चा केली. याचबरोबर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सूचना केल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात ‘जीबीएस’चे १३० रुग्ण झाले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात २५ रुग्ण असून, रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील ७४ आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात १३, पुणे ग्रामीणमध्ये ९ आणि इतर जिल्ह्यांतील ९ रुग्ण पुण्यात आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण २० ते ३९ वयोगटातील आहेत. दरम्यान, राज्यातील ७३ रुग्णांचे जीबीएस निदान झाले आहे. आरोग्य विभागाने शहराच्या विविध भागांतील १५४ नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्यापैकी ८ पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

रुग्णांच्या शोधासाठी घरांचे सर्वेक्षण

पुणे महापालिका – ३७,८०३

पिंपरी-चिंचवड महापालिका – ९,०६९

पुणे ग्रामीण – ११,३७३

एकूण – ५८,२४५

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State has 127 gbs patients with two deaths reported and 20 on ventilators pune print news stj 05 sud 02