परिचारिकांवरील अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून त्यांच्या कामाचे तास कमी करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे सुश्रुषा सेवा उपसंचालक डॉ. प्रकाश भोई यांनी दिली आहे.
‘सोसायटी ऑफ मिडवाईव्हज इंडिया’ च्या (सोमी) पहिल्या राज्यस्तरीय परिषदेचे शुक्रवारी पुण्यात उद्घाटन करण्यात आले. या वेळी डॉ. भोई बोलत होते.
मिडवाईव्हजच्या (प्रशिक्षित सुईण) सबलीकरणासंबंधी असलेली ही परिषद दोन दिवस चालणार आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, ‘सोमी’ च्या सरसचिव मनोन्मनी व्यंकट, संस्थेच्या राज्यातील अध्यक्ष रोहिणी नगरे, सल्लागार डॉ. तपती भट्टाचारजी, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप, ससूनच्या अधिसेविका शकुंतला नागरगोजे आदी या वेळी उपस्थित होते.
भोई म्हणाले, ‘‘आता सुश्रुषा सेवा केवळ माता-बाल संगोपनापुरत्याच मर्यादित राहिल्या नसून जागतिक स्तरावर या सेवांमध्ये ‘स्पेस नर्सिग’, ‘ई- नर्सिग’ अशा नवीन शाखांचा उदय होत आहे. आपल्याकडेही या शाखांची ओळख व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कामावर असलेल्या परिचारिकांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा असून त्याबरोबरच त्यांच्यावरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यासाठी कामाचे तास कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.’’
व्यंकट म्हणाल्या, ‘‘अफगाणिस्तान, स्वीडन, श्रीलंका या देशांनी सुश्रुषेचे ‘मिडवाईफरी मॉडेल’ स्वीकारले आहे. यामुळे या देशांत स्त्रियांच्या बाळंतपणातील मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. मिडवाईव्हजचे म्हणजे प्रसविकांचे महत्त्व या देशांनी ओळखले. आपल्याकडील ‘ऑग्झिलिअरी नर्स मिडवाईव्हज’वर सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचाच अतिरिक्त भार असतो. त्यांना ‘मिडवाईफ’ चे काम करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. बाळंतपणातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांच्या सबलीकरणाची आवश्यकता आहे.’’
डॉ. चंदनवाले यांनी सांगितले की, ‘‘रुग्णाला सेवा देणे हे एकटय़ा डॉक्टरचे काम नाही. रुग्णालयाची कामगिरी हे सांघिक काम असल्यामुळे इतर कर्मचारी वर्गाच्या मतांना त्यात स्थान असणे आवश्यक आहे. परिचारिका वर्गाला शस्त्रक्रियेतील टप्प्यांची माहिती असायला हवी. अनेकदा परिचारिका डॉक्टरांपेक्षा बुद्धिमान असल्याचे माझे निरीक्षण आहे. डॉक्टरांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे.’’