सौम्य लक्षणे दाखवणाऱ्या एक्सबीबीचे अस्तित्व कायम
पुणे : गेल्या वर्षभरात देशातील करोना महासाथ नियंत्रणात आली आहे. मात्र करोनाच्या नवनव्या प्रकारांचे डोके वर काढणे अद्यापही पूर्ण थांबलेले नाही. ओमायक्रॉन या करोनाच्या प्रकाराचे उपप्रकार अधूनमधून रुग्णसंख्येतील वाढीस कारणीभूत ठरत असतानाच बीए. २.७५ या प्रकाराला एक्सबीबी या नव्या उपप्रकाराने आता जवळजवळ हद्दपार केल्याचे जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्यांवरून स्पष्ट होत आहे. ओमायक्रॉन विषाणूच्या प्रकारांतील त्यातल्या त्यात गंभीर म्हणून बीए.२.७५ हा प्रकार ओळखला जात होता. त्या पार्श्वभूमीवर त्याचे नियंत्रणात येणे हा दिलासा समजला जात आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या माहितीतून ही बाब स्पष्ट होत आहे.
करोनाच्या अनेक उत्परिवर्तनांपैकी ओमायक्रॉन हा उपप्रकार हा डेल्टा आणि इतर प्रकारांच्या तुलनेत सौम्य म्हणून ओळखला गेला. या प्रकाराच्या वाढीचा वेग प्रचंड मात्र लक्षणे सौम्य होती. असे असले तरी ओमायक्रॉनचा बीए.२.७५ हा प्रकार मात्र काहीसा गंभीर होता. त्यामुळे ओमायक्रॉन वाढीच्या काळात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत बीए.२.७५ ने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय होती. मात्र, एक्सबीबी या अगदी अलीकडे आढळून आलेल्या नव्या उपप्रकारामुळे बीए.२.७५ हा प्रकार अत्यल्प राहिल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. एक्सबीबीच्या प्रमाणात वाढ दिसत असली तरी त्यामुळे संसर्गाचा वेग किंवा तीव्रता यांमध्ये कोणतीही वाढ दिसत नसल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही महिन्यांत राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांनी यापूर्वी वेळोवेळी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे करोना महासाथीचे आता एंडेमिक (त्या त्या भौगोलिक प्रदेशात आढळणारा एक सर्वसाधारण आजार) मध्ये होत आहे. मात्र, विषाणू हे आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वत:मध्ये आवश्यक बदल करत जिवंत राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे सातत्याने रुग्णांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करणे आणि विषाणूंच्या बदलत्या वर्तनावर नजर ठेवून त्याप्रमाणे धोरण ठरवणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. तसेच, जोखीम गटातील नागरिकांनी करोना लशीच्या मात्रा आणि वर्धक मात्रा घेण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली आहे.