पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील ताकदीच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेत नेतृत्व करण्याची संधी दिली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पिंपरी- चिंचवड शहरातील दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जयंत पाटील यांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत केले, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख उपस्थित होते.
हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवड दौऱ्यानंतर शरद पवार गटात इनकमिंग सुरू; कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्यासाठी लवकरच होणार मेळावा
पाटील म्हणाले, ‘शरद पवार यांच्या शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेवर विश्वास ठेऊन ज्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, त्या कार्यकर्त्यांवर कधीही अन्याय होणार नाही, त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल. दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील ताकदीच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेत नेतृत्व करण्याची संधी दिली जाईल.दरम्यान, सागर तापकीर, राहुल पवार, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे खजिनदार ॲड. संतोष शिंदे यांनी पक्षप्रवेश केला.
महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असणारे ५० ताकदीचे उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. टप्प्याटप्प्याने त्यांचे पक्षप्रवेश केले जातील. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शहरातील युवा चेहऱ्यांना पक्षामध्ये खूप मोठी संधी असून, महापालिकेत नव्या दमाचे युवा नगरसेवक पाहायला मिळतील, असे गव्हाणे म्हणाले.