लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे २०२३-२४साठीचे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार यंदा राज्यभरातील ११० शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले असून, पुरस्कार प्रदान कार्यक्रम शिक्षक दिनी (५ सप्टेंबर) मुंबईत होणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३पासून राबवण्यात येते. २०२३-२४च्या पुरस्कारांसाठी शिक्षकांच्या अंतिम निवडीसाठी २८ ऑगस्ट रोजी राज्य निवड समितीची ऑनलाइन बैठक झाली. त्यानंतर निवड समितीने ३० ऑगस्ट रोजी शिक्षकांची गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय निवडयादी शासनाला सादर केली. त्यानुसार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले.

आणखी वाचा-पुणे : मोबाइलमधील हॉटस्पॉट यंत्रणेचा वापर करण्यास नकार दिल्याने तरुणाचा खून, हडपसर भागातील घटना

समितीने केलेल्या शिफारसीनुसार प्राथमिक विभागात ३८, माध्यमिक विभागात ३९, आदिवासी क्षेत्रासाठी १९, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कासाठी ८, विशेष कला-क्रीडा शिक्षक विभागात २, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक गटात १, स्काउट-गाईड गटात दोन अशा एकूण १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली. तसेच वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक प्रवर्गातील एक पुरस्कार न्यायालयाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आला आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे नुकतेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यात सागर बगाडे, मंताय्या बेडके यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कारानंतर आता राज्यस्तरावरील पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत.

Story img Loader