पुणे : राज्यातील शालेय शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षक पुरस्कारांतील पुरस्कारप्राप्त शिक्षकांची घोषणा रखडल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर सुरू होऊनही पुरस्कार जाहीर झालेले नसल्याने शिक्षण विभागाला पुरस्कारांचा विसर पडला का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागाने २८ जूनला शासन निर्णय प्रसिद्ध करून शिक्षक पुरस्कारांसाठीचे नवे निकष आणि प्रक्रिया जाहीर केली. तसेच या पुरस्कारांचे नाव बदलून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार करण्यात आले.
पुरस्कारासाठी शिक्षकांचे अध्यापन कौशल्य आणि विद्यार्थ्यांचे आकलन तपासले जाणार असल्याचे, सप्टेंबरमध्ये पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर २६ ऑगस्टला पुन्हा परिपत्रक प्रसिद्ध करून राज्यातील १०९ शिक्षकांना ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालनालयाने पुरस्कारांसाठीची प्रक्रिया पूर्ण करून शासनाकडे प्रस्ताव सादर केला. मात्र अद्यापही पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली नाही.ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्रचे (एटीएम) संयोजक विक्रम अडसूळ म्हणाले, की करोना काळात केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची प्रक्रिया करून पुरस्कार प्रदान केले. मात्र राज्य शासनाने राज्य शिक्षक पुरस्कार दोन वर्षे दिलेलेच नाहीत. या पुरस्कारांना मोठी परंपरा आणि प्रतिष्ठा आहे. यंदा पुरस्काराची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार शिक्षकांनी अर्जही केले. शिक्षक पुरस्कार केंद्राच्या धर्तीवर शिक्षक दिनी, ५ सप्टेंबरलाच प्रदान केले पाहिजेत. यंदा या पुरस्कारांना बराच उशीर झाला आहे. शासनाने लवकरात लवकर पुरस्कारप्राप्त शिक्षकांची घोषणा करून पुरस्कार प्रदान करावेत.
हेही वाचा : वन्यजीव प्रेमी महिलांचे ‘जंगल बेल्स’; पर्यटनाबरोबर समाज आणि पर्यावरणभान रुजवण्याचे ध्येय
फाईल शालेय शिक्षणमंत्र्यांकडे
पुरस्कारांसाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून फाईल शालेय शिक्षणमंत्र्यांकडे सादर करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुरस्कार कधी जाहीर होतील हे सांगता येणार नाही, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.