कुटुंबामध्ये एकुलता एक असलेल्या कमावत्या व्यक्तीचा एसटीच्या अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पत्नीवर आली. या कुटुंबात एक वर्षांची मुलगी आणि सासू असल्यामुळे या घरासमोर आर्थिक समस्या उभी राहिली. पत्नीने नुकसान भरपाई मिळावी म्हणून एसटी महामंडळाच्या विरोधात दावा दाखल केला. मात्र, न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर नुकसान भरपाई मिळण्यासाठी काही वर्षे थांबावे लागणार हे निश्चित होते. त्यामुळे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय महालोकअदालतीमध्ये हा दावा दाखल करण्यात आला आणि तो तडजोडीने दावा मिटवण्यात आला. या दाव्यात एसटी महामंडळाने बारा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. या निर्णयामुळे कुटुंबासमोरचा आर्थिक प्रश्न काही प्रमाणात तरी सुटला आणि एका वर्षांच्या चिमुरडीचे भविष्य देखील सुरक्षित झाले.
अजित अशोक थोरात (वय २८, रा. एकलहरे, ता. आंबेगाव जि. पुणे ) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. थोरात २० जून २०१४ रोजी पुण्याकडून नाशिककडे दुचाकीवरून जात होते. त्या वेळी पुण्याकडे येणाऱ्या एसटीने एकलहरे गावात थोरात यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात एसटी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. थोरात यांनी आयटीआयचा प्रशिक्षणक्रम पूर्ण केला होता आणि ते एका खासगी वाहतूक संस्थेत कामाला होते. त्यांना दरमहा नऊ हजार रुपये वेतन होते. कुटुंबात ते एकुलते एक कमावते असल्याने आणि त्यांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे त्यांची २४ वर्षीय पत्नी सासू व एक वर्षांची मुलगी यांच्यापुढे आर्थिक प्रश्न उभा राहिला होता.
याप्रकरणी थोरात यांची पत्नी न्यायालयात गेली होती. मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे नुकसान भरपाई मिळावी, म्हणून डिसेंबर २०१४ मध्ये त्यांनी दावा दाखल केला होता. न्यायालयात दाव्याच्या दिनांकाला फेऱ्या माराव्या लागणार असल्यामुळे थोरात यांच्या पत्नीने हा दावा तडजोडीसाठी लोकन्यायालयात सादर करण्याचा निर्णय घेतला. अर्जदार यांच्या वतीने अॅड. तुषार पाचपुते व एसटी महामंडळाच्या वतीने अॅड. अतुल गुंजाळ यांनी हा दावा तडजोडीने मिटविण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या आठवडय़ात झालेल्या राष्ट्रीय महालोकअदालतीमध्ये एसटी महामंडळाने पूजा यांना १२ लाख रुपये देण्याचे मान्य केले. या वेळी एसटीच्या पुणे विभागाचे विभागीय अधिकारी शैलेश चव्हाण उपस्थित होते.

Story img Loader