राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांत शिरून प्रवासी पळविणाऱ्या खासगी वाहतूकदारांच्या एजंटाचा फटका एसटीला नेहमीच बसतो. अनेक उपाययोजना करूनही एजंटांचा विळखा हटत नसल्याने आता एसटीनेही त्यांच्याशी स्पर्धा करण्याची तयारी करून केली असून, त्यानुसार या खासगी वाहतूकदारांच्या थांब्यावरूनही प्रवासी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटीचे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण याबाबत म्हणाले, की बस स्थानकांबरोबरच एसटीच्या अधिकृत थांब्यांवरून खासगी वाहतूकदारांकडून प्रवासी पळविले जातात. त्यामुळे आता आम्हीही त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या मार्गावर असलेल्या खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या थांब्यांवर एसटी थांबवून त्या ठिकाणाहूनही प्रवासी घेतले जाणार आहेत. आम्ही खासगी वाहतूकदारांसारखे प्रवाशांना ताटकळत ठेवणार नाही. जास्तीतजास्त पाच मिनिटे या ठिकाणी एसटीची बस थांबविण्यात येईल.
 ‘एस्सेल वर्ल्ड’ साठी थेट बससेवा
बोरीवली येथे ‘एस्सेल वर्ल्ड’ला जाण्यासाठी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एसटीच्या वतीने पुण्याहून त्या ठिकाणी थेट हिरकणी बससेवा सुरू करण्यात आली आहे. स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी या तीन बसस्थानकांवरून या बसेस सोडण्यात येणार आहेत. सकाळी सात वाजता निघणारी बस सकाळी अकरा वाजता तेथे पोहोचेल. संध्याकाळी पाच वाजता तेथून परतीची बससेवा असेल. या प्रवासासाठी स्वारगेटहून ५४८ रुपये, शिवाजीनगरहून ५२७, तर पिंपरीतून ५०३ रुपये भाडे आकारणी केली जाणार आहे.
 आजपासून ‘प्रवासी वाढवा अभियान’
एसटीच्या वतीने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीमध्ये प्रवासी वाढवा अभियान राबविण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक फेरीमध्ये किमान चार प्रवासी वाढविण्याचे उद्दिष्ट वाहकांना देण्यात आले असल्याचे शैलेश चव्हाण यांनी सांगितले. एसटीच्या प्रवाशांची संख्या एप्रिल ते जून या काळात वाढलेली दिसते. मात्र मार्चनंतर प्रवासी कमी होतात. त्यामुळे हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रवासी संख्या वाढविण्याबरोबरच उत्पन्न वाढविणे हा त्यामागचा उद्देश आहे.

Story img Loader