पिंपरीतील वल्लभनगर बस स्थानकातून ६३ दिवसांनी सोलापूरच्या दिशेने पहिली एसटी धावली आहे. गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभर विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे, कर्मचारी आंदोलन करत आहेत. सोलापूरच्या दिशेने निघालेल्या एसटीला स्थानकातून बाहेर पडत असताना पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता, अशी माहिती आगारातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोलापूर आणि नाशिकच्या दिशेने एसटी धावली असून एसटी सेवा हळूहळू सुरू होत आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. आंदोलनाद्वारे ते आपल्या विविध मागण्यांवर ठाम आहेत. अशीच परिस्थिती राज्यभर दिसत आहे. पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर बस आगारात २०० पेक्षा अधिक कर्मचारी, वाहक आणि चालक आहेत. मात्र सद्य स्थितीला केवळ दोन एसटी चालक आणि दोन वाहक असे चार कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.
इतर कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळं एसटी सेवा सुरळीत करता येत नाही. दरम्यान, आज ६३ दिवसांनी वल्लभनगर बस स्थानकातून सोलापूरच्या दिशेने दोन एसटी बस रवाना झाल्या आहेत. दुपारी १२:१५ आणि १२: ३० च्या सुमारास एसटी धावली आहे. दोन्ही एसटीमध्ये ८- १० प्रवासी होते. एसटीला स्थानकातून बाहेर निघेपर्यंत पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. तसेच दोनच्या सुमारास नाशिकला देखील एसटी सोडण्यात आली आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून डेपो मॅनेजर स्वाती बांद्रे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक हनुमंत गोसावी, सहाय्यक वाहतूक अधीक्षक गोविंद जाधव, पोलीस अधिकारी मिसाळ हे उपस्थित होते.