पुणे : महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीकडून मंगळवारी (२७ ऑगस्ट) पुकारलेला एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला. राज्यातील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. बंदची व्याप्ती विचारात घेऊन राज्यशासनाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीनंतर व्यापाऱ्यांचा बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा, आमदार श्रीमती माधुरीताई मिसाळ, तसेच पणन, वित्त सहकार, नगरविकास विभागाचे मुख्य सचिव, पणन संचालकांसह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. बैठकीत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललितजी गांधी यांनी व्यापाऱ्यांनी भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडल्या. समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया आणि दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी बाजार समितीच्या विविध प्रश्नांची मांडणी केली. फॅमचे अध्यक्ष जितेंद्र शहा, सचिव प्रितेश शहा, मोहन गुरनानी, दीपेन अगरवाल, भीमजी भानुशाली, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, नितेश विरा, दी पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, अनिल भन्साळी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>>५०० ते ६०० टन ऊस असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ; अजित पवार म्हणाले…
फडणवीस यांनी व्यापाऱ्यांचे सर्व प्रश्न समजून घेतले. व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कृती समिती सदस्य, मुख्यसचिव, तसेच अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीने ३० दिवसांमध्ये योग्य निर्णय घेण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले. बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ललीत गांधी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले, तसेच बंद मागे घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले. त्यानंतर कृती समितीने एक दिवसीय राज्यव्यापी बंद तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया यांनी दिली.