पिंपरी : ‘आळंदीत अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था चालविल्या जात आहेत. वसतीगृहासाठी समाज कल्याण व बालविकास खात्याची परवानगी घेतली जात नाही. संस्थांची धर्मादाय आयुक्तालयाच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाकडे नाेंदणी झालेली नाही. ज्या संस्थांना धर्मादाय आयुक्तांची परवानगी आहे. परंतु, नियमावलीचे पालन केले जात नाही, अशा संस्थांवर दोन दिवसांत कारवाई करून अहवाल पाठवा,’ अशी सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संबंधित विभागाला केली.
आळंदी परिसरातील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था, तसेच अनधिकृत शालेय विद्यार्थी वसतीगृहातील बालकांच्या लैगिंक शोषणाबाबत आळंदीकर ग्रामस्थांनी महिला आयोगाकडे तक्रार केली हाेती. त्यानंतर चाकणकर यांनी सोमवारी आळंदीत ग्रामस्थ, पोलीस अधिकारी, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, उपविभागीय अधिकारी अनिल धोंडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आयोगाच्या सदस्या नंदिनी आवडे, बालहक्क संरक्षण आयोगाच्या जयश्री पालवे, डी. डी. भोसले या वेळी उपस्थित होते.
चाकणकर म्हणाल्या, ‘वारकरी शिक्षण संस्था या नावाने अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांकडून वार्षिक शुल्क घेऊन उत्पन्नाचे साधन म्हणून व्यावसायिक तत्त्वावर अनधिकृत वसतीगृह चालविली जातात. शासनाच्या निकषांचे पालन केले जात नाही. अनेक संस्थांमध्ये भाेजन व्यवस्था नाही, स्वयंपाकगृह नाही, स्वच्छ पाणी नाही, प्रति विद्यार्थी निवासी जागेची व्यवस्था नाही, शाैचालये नाहीत, सुरक्षितता नाही. मिरवणुकीसाठी पैसे घेऊन भाडेतत्त्वावर मुले दिली जातात. पैसे घेऊन मुलांना तासन् तास कीर्तनात उभे केले जाते. भाेजनाचा खर्च वाचविण्यासाठी वारकरी वेश परिधान करून विद्यार्थ्यांना लग्न, सप्ताहाच्या पंगतीत पाठविले जाते. अत्याचाराची प्रकरणे आपसात मिटवली जातात. वसतीगृहासाठी समाज कल्याण व बालविकास खात्याची परवानगी घेतली जात नाही, अशा तक्रारी आहेत. अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर कारवाईसाठी समाज कल्याण व बालविकास विभागाला दाेन दिवसांची मुदत दिली आहे’.
आळंदीत १७५ वारकरी शिक्षण संस्था
आळंदी परिसरात १७५ वारकरी शिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये आळंदीत ११५, तर दिघीत ६० आहेत. या संस्थांमध्ये पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १५८ संस्थांमध्ये मुले आहेत. ‘केवळ मुली असणाऱ्या चार संस्था आहेत. तर, मुले आणि मुली एकत्र असणाऱ्या १३ संस्था आहेत. मुले आणि मुली एकत्रित असलेल्या संस्थांमध्ये स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नाही. यामध्ये अनेक चुकीच्या घटना घडल्या असून, तक्रारी दाखल झाल्या आहेत. संबंधित संस्था चालकांना अटक केली आहे. गैरकृत्यांना लगाम घालण्यासाठी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत,’ रूपाली चाकणकर यांनी सांगितले.