पुणे : विज्ञान मुळातच आंतरराष्ट्रीय आहे. ब्रेक्झिट किंवा उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवादी राजकारणाने विज्ञानाला बिघडू देऊ नका, असे विधान अमेरिकेचे नोबेलप्राप्त शास्त्रज्ञ प्रा. हेरॉल्ड वर्मस यांनी मंगळवारी केले.राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेतर्फे अॅक्सिओम्स ऑन करिअर इन सायन्स या विषयावर प्रा. वर्मस यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे संचालक डॉ. मोहन वाणी, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे आदी या वेळी उपस्थित होते. लुईस थॉमस विद्यापीठात अध्यापन करत असलेल्या प्रा. वर्मस यांनी विद्यार्थी, शास्त्रज्ञांशी संवाद साधला.
विज्ञान राजकारणापासून कधीच मुक्त नसते. विज्ञान समाजाची सेवा करते. कोणाला कोणत्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे हे ठरवून विज्ञानातील कारकिर्द घडवण्यासाठी ध्येय निश्चित करता येते. योग्य समस्येसाठी योग्य प्रश्न विचारणे, योग्य पद्धत वापरणे आवश्यक आहे, वैज्ञानिक शोध सक्षम करण्यासाठी पाठपुरावा आणि योग्य आकलनासह योग्य व्याख्या निश्चित करणे आवश्यक आहे, असे प्रा. वर्मस यांनी सांगितले. अमेरिका-प्रथम धोरणे, व्हिसा, इमिग्रेशन प्रक्रिया आणि स्पर्धात्मकता हे विज्ञानातील आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी धोक्याचे घटक आहेत. विज्ञान आपल्याला प्रेरणा देऊ शकते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मानव असणे म्हणजे काय हे विज्ञान आपल्याला शिकवू शकते. गेल्या काही वर्षांत विज्ञानाच्या क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढत आहे. मात्र अल्पसंख्याक गटांचे प्रतिनिधित्व वाढवणे हे एक आव्हान आहे, असेही ते म्हणाले.