पुणे : आपल्या देशाने निर्माण केलेले संविधान आणि त्यानुसार आचरण होणे अत्यंत महत्वाचे आहे. संविधानाला धरून प्रामाणिकपणे वाटचाल व्हावी. संविधानाची मार्गदर्शक तत्वे, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य यांचे श्रद्धापूर्वक आचरण केले गेले पाहिजे. या कर्तव्यांची समाजात आणि घरात देखील चर्चा व्हावी, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
तुळशीबागवाले कॉलनीत आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत ते ‘विश्वगुरू भारत’ या विषयवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहजीवन व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी उपस्थित होते. व्याख्यानमालेचे हे २३ वे वर्ष होते.
यावेळी मोहन भागवत म्हणाले की, आपली विशिष्टता सांभाळत विविधता जपणे आणि सबल होणे आजच्या काळात आवश्यक आहे.मनात-बुद्धीत असलेली स्पष्टता कृतीत आणणे आणि त्यात दांभिकता नसणे गरजचे आहे. जात- पात- धर्मभेद, अज्ञान, स्वार्थ टाकून देत सर्वांना समदृष्टीने पाहतो तोच खरा जाणकार होय.यासाठी स्वत:चे आत्मनिरिक्षण करणे, संतांकडून होणाऱ्या प्रबोधनाचा धांडोळा घेत, चुकीच्या सवयी निपटून काढत संविधानानुसार प्रामाणिकपणे चालले पाहिजे.
हेही वाचा >>>पिंपरी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले…
तसेच ते पुढे म्हणाले की, भारतीय प्राचीन, सनातन हिंदूराष्ट्राची उत्पत्ती धर्मतत्त्वातून, सत्त्यातून झाली आहे. सृष्टीचे विज्ञान जाणत जगाच्या कल्याणाची इच्छा ठेवून आपले राष्ट्र निर्माण झाले आहे. हाच इतिहास आहे, पण तो आजच्या काळात दडवला जात आहे. हा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आज विश्वगुरुत्वाची आवश्यकता आहे. आज विश्वाचा समतोल साधण्यासाठी महाशक्तीची नव्हे तर विश्वगुरुत्वाचीच आवश्यकता आहे.आज देश भौतिक प्रगती करीत आहे. युवा पिढीच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवल्यास विश्वाचा स्वाभाविक गुरू हा भारतच होऊ शकेल ही भविष्यवाणी नव्हे तर हा साधासोपा हिशोब असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, सुख-सुविधा, प्रगत तंत्रज्ञान यातून जग जवळ आले,अंतरे कमी होत गेली परंतु मनामनातील अंतर मात्र वाढत गेले. यामुळेच या सुखसुविधा असूनही मन:शांती नाही.या परिस्थितीत मानवी समाजपातळीवर विचार केल्यास प्रत्येकाच्या मनात युद्धच सुरू आहे. पर्यावरणाचा अशक्य ऱ्हास होत आहे. अन्न,जमीन,पाणी, हवा विषयुक्त होत आहे; ऋतु अनियमित झाले आहेत; जमीन अस्थिर झाली आहे, ढळायला लागली आहे. अशा परिस्थितीत जगामध्ये कुणीच सुखी होऊ शकणार नाही. प्रत्येकाचा स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे; परंतु सृष्टीला जगवायचे आहे की नाही याचा विचार आज होताना दिसत नाही. विश्वाच्या अस्तित्वाकडे पाहणारी अपुरी दृष्टी बदलून विश्वाच्या चिंतनाकडे वळलेला भारत सामर्थ्यवान ठरेल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.