शिवणे ते खराडी या नदीकाठच्या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी करत शिवसेनेच्या कोथरूड विभागातर्फे शुक्रवारी महाापालिका भवनात आंदोलन करण्यात आले. आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांना नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन दिल्यानंतर या रस्त्यात येत असलेल्या रजपूत झोपडपट्टीचे पुनर्वसन महिनाभरात पूर्ण केले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
नदीकाठच्या रस्त्याची योजना महापालिकेत गेली अनेक वर्षे प्रस्तावित असली, तरीही या रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. विशेषत: नळस्टॉप ते महापालिका भवन दरम्यानच्या रस्त्यात रजपूत झोपडपट्टीचे पुनर्वसन होत नसल्यामुळे वाहनांची मोठी कोंडी या अरुंद जागेत होते. या रस्त्याचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी शिवसेनेच्या कोथरूड विभागातर्फे स्वाक्षरी मोहीमही घेण्यात आली होती.
नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त भाग घेऊन रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली आहे. मात्र, या महत्त्वाच्या विषयाबाबत महापालिकेत कोणतीही हालचाल दिसत नाही, अशी तक्रार आमदार मोकाटे यांनी शुक्रवारी आयुक्तांकडे केली. हे काम सुरू झाले नाही, तर नाईलाजाने रस्ता रोखा आंदोलन करावे लागेल, असाही इशारा त्यांनी दिला. नगरसेवक योगेश मोकाटे तसेच गजानन थरकुडे, नंदकुमार घारे, विलास सोनावणे, राजू हुलावळे, अनिल घोलप, जगदीश दिघे, किरण साळी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Story img Loader