खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून खडकवासला प्रकल्पातून नदीला पाणी सोडण्याऐवजी नवा मुठा उजवा कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी इंदापूर, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यांच्या ठिकाणी देखील पाऊस सुरू असून बारामती, इंदापूर, शिरूर आणि दौड तालुक्यात तुलनेने कमी पावसाने हजेरी लावली आहे. या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना फायदा होत आहे. खडकवासला धरण १२ जुलै रोजी पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत खडकवासला धरणातून तब्बल तीन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या पाण्याचा कालव्यावर अवलंबून असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उपयोग होत नाही.
दरम्यान, इंदापूर, दौंड तालुक्यात ऊसाच्या लावणीला सुरूवात केली आहे. याशिवाय खरीपाच्या पिकांची देखील पेरणी सुरू आहे. बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांची शेततळी देखील सध्या कोरडीच आहेत. शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी आवर्तनात शेततळ्यामध्ये पाणी भरता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यासाठी व उसाच्या लागणी करण्यासाठी आणि खरिपातील पिकांसाठी जलसंपदा विभागाने नदीला खडकवासला कालव्याला इंदापूर तालुक्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणीचे पत्र शेतकऱ्यांकडून देण्यात आले आहे.
इंदापूर आणि दौंड तालुक्यात कमी पाऊस झाला आहे. पेरणीचे दिवस सुरू असून या तालुक्यातील नागरिकांनी खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याऐवजी मुठा उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. याबाबत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. – विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग